मुंबई : “कार्डिलिया क्रूझ ड्रग्जप्रकरणात आर्यन खानला एनसीबीने आज (२७ मे) क्लीन चिट दिली. यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचा जो फर्जीवाडा उघड केला होता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

महेश तपासे म्हणाले, “जे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर केले ते आज खरे ठरले आहेत. नवाब मलिक पहिल्या दिवसापासून एनसीबीने टाकलेली धाड हीच फर्जीवाडा आहे हे सांगत होते. एनसीबीने भाजप संबंधित नेमलेले पंचही फर्जी होते. शिवाय त्याच पंचांनी ते उघड केले होते.”

“नवाब मलिक यांनी घेतलेले आक्षेप बरोबर होते हे स्पष्ट झाले”

“एका पंचाचा तर अनैसर्गिक मृत्यूही झाला आहे. शिवाय आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा समोर आली होती. त्यामुळे आज आर्यन खानला क्लीनचिट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेले आक्षेप बरोबर होते हे स्पष्ट झाले आहे,” असं मत महेश तपासे यांनी व्यक्त केलं.

आर्यन खान प्रकरणातील नेमक्या घडामोडी काय?

एनसीबीने आर्यन खानसह ६ जणांना पुरावे न मिळाल्याने क्लीन चिट देताना या प्रकरणातील घटनाक्रमाची माहितीही दिली आहे. याप्रमाणे, एनसीबीने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन, अरबाज, इशमत आणि गोमितला इंटरनॅशनल पोर्ट टर्मिनल येथून ताब्यात घेतलं. नुपूर, मोहक आणि मुनमुनला कोर्डिला क्रुझवरून ताब्यात घेण्यात आलं. यापैकी आर्यन आणि मोहक वगळता सर्वांकडे ड्रग्ज सापडले.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीने केला. नंतर ६ नोव्हेंबर २०२१ रोजी या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आलं. एसआयटीने या प्रकरणात तपास केला. तपासात ६ जणांविरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांचे आरोपपत्रातून नाव हटवण्यात आले.

एनसीबीकडून १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल

या प्रकरणात आतापर्यंत एनसीबीने १० व्हॉल्यूमचे ६००० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान आणि महककडे ड्रग्ज सापडलं नव्हतं. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी एकूण १४ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र, चौकशीत ६ आरोपींविरोधात पुरावे मिळाले नसल्याचं एनसीबीने जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये सांगितलं आहे. तसेच या ६ जणांची नावं आरोपपत्रातून वगळ्यात आली आहे.

पुरावे न मिळाल्याने आरोपपत्रातून वगळण्यात आलेले ६ जण कोण?

१. आर्यन खान
२. अविन शुक्ला
३. गोपाल आनंद
४. समीर साईघन
५. भास्कर अरोरा
६. मानव सिंघल

नेमकं प्रकरण काय?

‘एनसीबी’ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर कारवाई केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आली होती. यावेळी काही संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते.

या प्रकरणी ‘एनसीबी’ने या क्रूझवर आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी शिवसेनेकडून थेट मोदींचा उल्लेख; म्हणाले, “भाजपाचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही…”

एनसीबीने आर्यनसोबत इतर सात जणांनाही ताब्यात घेतले होते. एनसीबीने आर्यन खानची कसून चौकशी केली होती. त्याच्यासोबतच अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, नूपुर सारिका, इसमीत सिंह, मोहक जसवाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा या सर्वांचीही एनसीबीने चौकशी केली होती. या चौकशीनंतर आर्यन खानसह दोघांना अटक करण्यात आलं होतं.

Story img Loader