राष्ट्रवादीचे नेते भाजपाला समर्थन देण्यासाठी अमित शहा यांना भेटले, अशा ऐकीव माहितीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलं. ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याला कोणताही आधार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेत महेश तपासे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा खोडून काढला आहे.
“राष्ट्रवादीचे विचार सेक्यूलर, समतावादी, समाजवादी आहेत. त्यामुळे भाजपाबरोबर कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठकही झालेली नाही. म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी चुकीचे विधान करु नये,” असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला.
“शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार? याबाबत अनेक वर्तमानपत्रांनी सर्व्हे केला. पण, महाविकास आघाडी एकत्रित, एकदिलाने आणि एकविचाराने ताकदीने उभी राहत भाजपाला हद्दपार करणार आहे,” असं महेश तपासे यांनी सांगितलं.
“बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा त्यापूर्वी विधानपरिषदेच्या निकाल लक्षात घेता सगळीकडे महाविकास आघाडीला विजय मिळत आहे. शरद पवार यांच्या निवृत्तीचा परिणाम होणार नाही. उलट महाविकास आघाडी आणि देशपातळीवर भाजपा विरोधात असलेले लहानमोठे पक्ष एकत्र करण्यास ताकद मिळणार आहे,” असेही महेश तपासे म्हणाले.