गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना ( शिंदे गट ) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पण, ठाकरे गटाने हा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप शीतल म्हात्रेंनी लगावला आहे. याप्रकरणी ठाकरे गटातील काही जणांना अटकही करण्यात आली आहे. आज ( १४ मार्च ) दुसऱ्या दिवशीही विधिमंडळात हा मुद्दा चर्चीला गेला आहे.
राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणातील तरूणांच्या अटकेवरून आक्षेप घेतला. ‘रात्री दोन-दोन वाजता पोलीस घरातून तरूणांना ताब्यात घेत आहेत,’ असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. पण, ‘हा तपासाचा भाग आहे. अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का?,’ असं प्रत्युत्तर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं आहे.
“मुख्यमंत्री महोदय अशी अटक बरी नाही”
विधानसभेत बोलताना जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं, “शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे प्रकरणात एसआयटी नेमलेली आहे. एसआयटीचं कामकाज लवकर सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सोमवारपासून चौदा तरूणांना अटक करण्यात आली. हा व्हिडीओ खरा आहे की मॉर्फ केलेला आहे, याचा निर्णय येऊद्या. पण, लोकांच्या घरी दोन-दोन वाजता पोलीस जाऊन तरूणांना ताब्यात घेत आहेत. त्यांची चुक काय, हे तर कळुद्या. मुख्यमंत्री महोदय अशी अटक बरी नाही. तरूण पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.”
“त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार…”
याला उत्तर देताना शंभूराज देसाईंनी सांगितलं, “शीतल म्हात्रे आणि राज प्रकाश सुर्वे यांनी याप्रकरणी तक्रार केली आहे. ही गंभीर बाब आहे. त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार मॉर्फींग करताना झाला आहे. कोणत्याही स्त्रीच्या मनाला हे सहन होणार नाही.”
हेही वाचा : वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”
“अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का?”
“रात्री दोन वाजता उचलणे हा तपासाचा भाग आहे. पण, अशा गोष्टी करताना काही वाटलं नाही का? पोलीस त्यांचं काम करत आहेत. तपासात सर्व बाबी पुढे येतील. तपासात सर्व गोष्टी पुढं आल्यावर त्याच्यात कोण दोषी आहेत, हे कळेल,” असं शंभूराज देसाई म्हणाले.