राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते आहे. उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाऱ्यांचं भाजपात स्वागत आहे. उदयनराजे हे तर छत्रपतींचे वंशज आहेत असं सूचक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यामुळे नाराज उदयनराजे भाजपात जाणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोडले तर इतर कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्याला ते जुमानत नाहीत. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांचं आणि उदयनराजेंचंही फारसं पटत नाही. राष्ट्रवादी पक्ष बांधणीत ते फारसे सक्रिय नसतात असाही आरोप त्यांच्यावर होतो आहे. अशात त्यांना यावेळी तिकिट मिळणार नाही अशीही चर्चा रंगली आहे.
सगळ्या पक्षात माझे मित्र आहेत असं उदयनराजे कायम सांगतात. तसेच त्यांची काम करण्याची एक वेगळी शैली आहे त्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग आहे. त्यामुळे उदयनराजेंचं एक स्वतंत्र संस्थानच आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर उदयनराजे पुढे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले या दोघांमध्ये काय चर्चा झाली ते समजलेलं नाही तरीही राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.