लाल दिव्यांच्या गाडय़ा, कार्यकर्त्यांची वर्दळ, नेतेमंडळींची उठबस, याशिवाय कामे करून घेण्यासाठी येणारे वेगळे, हे सत्ता असताना राष्ट्रवादीच्या कार्यालयात नेहमीचेच चित्र. सत्ता गेली आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयाला अवकळा पसरली. फारसे कोणी फिरकतही नसे. पण कालच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि आज लगेचच कार्यालय फुलले. नुसते फुलले नाही तर झिंदाबाद, मुर्दाबादपासून ते मारामारीपर्यंत वेळ आली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. तब्बल दोन वर्षांने राष्ट्रवादीच्या कार्यालयात जान आलेली बघायला मिळाले.

सत्ता असली की, साहजिकच महत्त्व प्राप्त होते. सत्ता गेल्यावर गर्दी टिकविणे हे आव्हान असते. राष्ट्रवादीला हे अनुभवास मिळाले. सत्तेत असताना, पक्षाध्यक्ष शरद पवार कार्यालयात येणार म्हटल्यावर केवढी वर्दळ असायची. लाल दिव्यांच्या गाडय़ा, कार्यकत्र्त्यांची गर्दी व्हायची. सत्ता गेली आणि चित्र पालटले. शरद पवार पक्षाच्या मुख्यालयात आले तरी सारे सुनेसुने वातावरण असते, अलीकडच्या काळात.

राष्ट्रवादीची तशी पीछेहाटच झाली आहे. अगदी अलीकडे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्ये कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचेच हे राष्ट्रवादीपुढे आव्हान आहे. कारण अपयश आल्यास पक्षाच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळेच नेतेमंडळी थोडेसे चिंतेतच आहेत. गुरुवारी मात्र राष्ट्रवादीच्या कार्यालयात वेगळे वातावरण होते. निमित्त होते, दिंडोशी आणि आससापच्या परिसरातील उमेदवारीचे. अनिल रावराणे यांनी सकाळी आमदार विद्या चव्हाण यांच्या विरोधात शक्तिप्रदर्शन केले. त्याची प्रतिक्रिया म्हणून विद्याताईंचे समर्थक पक्षाच्या मुख्यालयात जमले. मग घोषणाबाजी झाली. माजी मंत्री जयंत पाटील यांना संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी प्रकरण हातघाईवर आले, गोंधळ वाढला. आरेला कारे झाले. एकमेकांच्या अंगावर धावून गेले. हाणामारीपर्यंत वेळ गेली. शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

मग जयंत पाटील आणि सचिन अहिर हे विद्या चव्हाण व रावराणे या दोघांना एकत्र घेऊन बसले. तोडगा निघाला का, हे निवडणुकीत समजेल. कारण दोन्ही गटांचे नेते परस्परांना धडा शिकविण्यासाठी आतूर आहेत.

जे काही होईल ते निवडणुकीत होईल. मुंबईत आमची तेवढी ताकदही नाही. तरीही कार्यकर्ते उमेदवारीवरून हातघाईवर येत असल्यास, पक्षात जान आली हे तरी मान्य करावी लागेल – इति एक नेते. काही असो, राष्ट्रवादीतील तिकीट वाटपातील वादाची चर्चा तर सुरू झाली.