मराठा समाजाचा मुद्दा मुळाशी?

गेल्या आठवडय़ात विधान परिषदेपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला फटका बसला असून, विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्र या बालेकिल्ल्यातच भाजपने मुसंडी मारल्याने राष्ट्रवादीसाठी हा धोक्याचा इशारा मानला जातो. मराठा समाजाचे मोर्चे किंवा आरक्षणाच्या मागणीवरून झालेले आंदोलन यात राष्ट्रवादीचा पुढाकार असल्याचा संदेश गेल्याने त्याची इतर समाजांमध्ये प्रतिक्रिया उमटल्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. हाच कल नगरपालिका निवडणुकीत कायम राहिला आहे. कारण नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत राष्ट्रवादीची पिछेहाट झाली आहे. तळ्यात-मळ्यात राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी परस्परांवर स्तुतिसुमने उधळली होती. त्यावरून टीका झाल्यावर पवार यांनी नोटाबंदीवरून भाजप सरकारवर टीका केली होती. त्याचाही काही प्रमाणात पक्षाच्या यशावर परिणाम झाला असण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाचे मोठाले मोर्चे निघू लागल्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वात आधी दलित अत्याचारप्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीवरून वेगळा सूर लावला होता. त्यानंतर अन्य राजकीय नेत्यांनी तोंड फोडले होते. मराठा समाजाच्या मोर्चामागे राष्ट्रवादी ताकद लावत असल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रवादीलाच जबाबदार धरले होते.

यातून इतर मागासवर्गीय, दलित मतदार दुखावले गेले. मराठा समाजाच्या आंदोलनाची काही प्रमाणात झळ बसल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने मान्य केले. मराठवाडय़ात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले ते बहुधा मराठा समाजाच्या आंदोलनाचे फलित आहे. कारण मराठवाडय़ात जातीय संघर्ष अन्य भागांच्या तुलनेत अधिक आहे.

मराठा समाजाची बाजू घेतल्याने इतर समाजात त्याची प्रतिक्रिया उमटू लागल्याने राष्ट्रवादीने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व इतर मागासवर्गीय समाजातील धनंजय मुंडे यांना प्रचारात मुख्यत्वे उतरविले होते. मुंडे यांनी राज्यभर जवळपास ४० सभांमध्ये भाषणे केली. सुनील तटकरे, नवाब मलिक या नेत्यांनी दौरे केले.