राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यातील वाद आता अधिकाधिक तीव्र होऊ लागला आहे. एनसीबीनं २ ऑक्टोबर रोजी छापा टाकून आर्यन खानसह इतर आरोपींना अटक करणं हा बनाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केल्यानंतर एनसीबीनं देखील पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. या पार्श्वभूमीवर आता नवाब मलिय यांनी थेट एनसीबीला आव्हानच दिलं आहे. एनसीबीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकूण १४ लोकांना ताब्यात घेतलं असून ६ लोकांना सोडल्याची माहिती दिली आहे. त्यावर आता नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे.

“ते फूटेज जाहीर करा”

“मी म्हटलो ११ पैकी तिघांना सोडलं. एनसीबी सांगतंय ११ नाही, १४ लोकं होते. आम्ही सगळं फूटेज पाहिलं. तीन लोक सोडल्यानंतर हे फूटेज आम्ही जगासमोर आणलं आहे. मी एनसीबीला आव्हान करतो, की जर १४ लोकं होते, तर आणखीन तीन लोकं कोण होते ते त्यांनी जाहीर करावं. तुमच्या ऑफिसमधून ते लोकं बाहेर पडतानाचं फुटेज जाहीर करा. तेव्हा तिथे चॅनलची लोकंही होतीच. भाजपाच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ३ लोकांना सोडलं आहे. ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असं मी पुन्हा म्हणतो”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

“एनसीबीचे दिल्लीतील अधिकारी सांगत होते की आम्ही जागेवर पंचनामा करतो. मी त्यांना विचारू इच्छितो की मागच्या रविवारी रात्री साडेआठ वाजता तुम्ही काही फोटो माध्यमांना पाठवले. चुकून एक व्हिडिओ तुमच्याकडून पाठवण्यात आला. त्यात स्पष्टपणे दिसतंय की जप्ती क्रूजवर किंवा टर्मिनसवर आलेलं नाही. हे फोटो समीर वानखेडेंच्या कार्यालयातले आहेत. मागचे पडदेही समीर वानखेडेंच्या कार्यालयातले आहेत”, असा दावा देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

“…तर तुमच्या जावयाच्या कृत्यासाठी राष्ट्रवादीला जबाबदार धरावं का?” प्रविण दरेकरांचा नवाब मलिकांना प्रतिप्रश्न!

“मोहित कंबोज म्हणतात मी भंगारवाला आहे”

“काही लोक मला १०० कोटींच्या नोटिसा पाठवणार सांगतायत. मी वाट पाहतोय त्या नोटिशीची. एवढी माझी ऐपत आहे. भाजपाने माझी ब्रँड व्हॅल्यू १०० कोटी ठरवली यासाठी मी त्यांचे आभार मानतो. काल मोहित कंबोज म्हणाले नवाब मलिक भंगारवाला आहे. मला अभिमान आहे. माझे वडील आणि काही दिवस मी देखील भंगारचा व्यवसाय केला. कायदेशीर व्यवसाय करणं याचा मला अभिमान आहे, मी कोणत्याही मार्केटला बुडवलं नाही, सोन्याची तस्करी केली नाही, सोन्याच्या बाजारात फसवेगिरी केलेली नाही”, अशा शब्दात नवाब मलिक यांनी मोहीत कंबोज यांना देखील टोला लगावला आहे.

शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी मोहीत कंबोज यांचं नाव घेऊन आरोप केले होते. “एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आलं आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचं नाव सुनावणीदरम्यान आलं आहे. या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली किंवा महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला”, असा दावा नवाब मलिक यांनी केला.

Story img Loader