राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर निशाणा साधला आहे. फ्लेचर पटेल कोण आहेत? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी ट्वीटरला फ्लेचर पटेल यांचे एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फ्लेचर पटेल आणि समीर वानखेडे यांच्यात काय संबंध आहेत? अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीसमोर अनेक सवाल उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मनिष भानुशाली याने मी खबरी असल्याचं सांगितलं. गोसावी हा फरार आरोपी आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत २ ऑक्टोबरच्या आधी आपण त्यांना ओळखत नव्हतो अशी माहिती दिली आहे. स्वतंत्र पंच असल्याचं एनसीबीने सांगितलं असून मी त्याबाबतीत आज प्रश्न उपस्थित करत आहे. आता एनसीबीने हा फ्लेचर पटेल कोण आहे याचा खुलासा करावा. समीर वानखेडे यांच्याशी त्यांचा काय संबंध आहे? त्यांच्या कुटुंबातील लोकांसोबत ते फोटो टाकत आहेत. माय लेडी डॉन सिस्टर नावाने टॅग करत आहेत. समीर वानखेडे यांचा या फ्लेचर पटेलशी काय संबंध आहे?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे. फ्लेचर पटेल यांच्या प्रसिद्धीसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत असा आरोपही त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर केला.

“कोणतीही केस उभी करायची असते तेव्हा ज्या ठिकाणी घटना घडते तेव्हा तेथील प्रतिष्ठीत नागरिक, आजुबाजूची लोक यांना बोलवून पंचनामा करणं कायदेशीर तरतूद आहे,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

“गेल्या एक वर्षातील माहिती घेतली असता एनसीबीच्या तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच म्हणून फ्लेचर पटेल यांचं नाव आहे. याचा अर्थ स्वतंत्र पंच यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. ही कारवाई ठरवून केली असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. कोर्टाने अनेकदा स्वतंत्र पंच खूप केसेसमध्ये असल्यास यात तथ्य नसतं असा निष्कर्ष काढला आहे. याचा अर्थ एनसीबीच्या माध्यमातून फर्जीवाडा सुरु आहे,” असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. फ्लेचर पटेल तीन केसेसमध्ये स्वतंत्र पंच कसे झाले याचं उत्तर दिलं जावं अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

“समीर वानखेडे यांच्याशी फ्लेचर पटेलचे काय संबंध आहेत? ही लेडी डॉन कोण आहे? फ्लेचर पटेल त्यांच्यासोबत कुठे कुठे जात आहेत? मुंबईत असं कोणतं रॅकेट सुरु आहे? फ्लेचर पटेल लेडी डॉनसोबत फिल्म इंडस्ट्रीत काय दहशत निर्माण करत आहेत? दहशत निर्माण करुन पैसे उकळले जात आहेत का?,” अशी विचारणा नवाब मलिक यांनी केली आहे.

“मी आरोप केल्यानंतर एनसीबीने माझ्यावर टीका केली होती. पण तुम्ही खोट्या केसेस उभ्या करत आहात. घऱातली माणसं पंच करुन लोकांची फसवणूक केली जात आहे. फिल्म इंडस्ट्रीत फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या माध्यमातून काय उद्योग सुरु आहेत याचा खुलासा एनसीबीने करावा,” अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

“फोटोमध्ये लेडी डॉन सिस्टर असं दिसत आहे…पण काही लोकांनी मला हे वकील असून, एका राजकीय पक्षाच्या चित्रपट सेनेचे नेते आहेत, फिल्म इंडस्ट्रीतील अनेक लोक त्यांच्या कार्यालयात हजेरी लावत असतात असं सांगितलं. फ्लेचर पटेल, लेडी डॉन यांचं कनेक्शन काय हे मला माहिती नाही, पण जेव्हा माहिती येईल तेव्हा पर्दाफाश करु,” असं नवाब मलिक यांनी यावेळी सांगितलं.

“पंचनाम्याची एक पद्धत आहे. एकच व्यक्ती प्रत्येक केसमध्ये पंच असेल तर या केसेस खऱ्या आहेत की खोट्या हा प्रश्न कोर्टात निर्माण होतो. मला वाटतं पंच समीर वानखेडेंचा नातेवाईक आहे, त्यावर त्यांनी खुलासा केला पाहिजे,” असं नवाब मलिक म्हणाले.