मुंबईत रेव्ह पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी किरण गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला आहे. ही कारवाई बनावट असल्याचा आरोपही त्यांनी केला असून त्याचे फोटो आणि व्हिडीओही प्रसिद्ध केले आहेत.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु करत ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत भाजपाचे नेते एनसीबी अधिकारी बनून कारवाई करतात, असा खळबळजनक आरोप केला.
या प्रकरणात मनिष भानुशाली यांचे नाव चर्चेत आले आहे. मनिष भानुषाली हे भाजपाचे उपाध्यक्ष आहेत. ते एनसीबीच्या कारवाईदरम्यान आर्यन खान, अरबाज मर्चंटला घेऊन जातांना दिसले. मनिष भानुशाली यांचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एनसीबीचे भानुशाली यांच्यासोबत काय संबंध आहेत?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
Aryan Khan Drugs Case: “वानखेडे साहेबांनी…”; भाजपा नेत्याने केला NCB कनेक्शनसंदर्भातील खुलासा
दरम्यान नवाब मलिक यांनी एनसीबीने साक्षीदार म्हणून दाखवलेले किरण गोसावी व मनीष भानुशाली दोघेही धाड टाकण्यात आली त्यादिवशी एनसीबीच्या कार्यालयात होते हे दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत किरण गोसावी व मनीष भानुशाली गाडीतून उतरुन एनसीबी कार्यालयात जाताना दिसत आहेत. यावेळी गेटवर उपस्थित पोलीस कर्मचारी त्यांना थाबंवून त्यांची ओळख विचारताना दिसत आहे. यावेळी किरण गोसावी आपल्याकडच्या मोबाइलमधील काही माहिती त्या पोलीस कर्मचाऱ्याला दाखवतो. मनीष भानुशालीही यावेळी तिथेच मागे उभे होते. काही वेळाने पोलीस कर्मचारी त्यांना जाण्याची परवानगी देतो.
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांनी गोसावी आणि भानुशाली धाड टाकली तेव्हा आणि त्यानंतरचे साक्षीदार असल्याचं सांगितलं आहे. नवाब मलिक यांनी आरोप करताना भाजपा महाराष्ट्र, महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूडची गेल्या एक वर्षांपासून बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. ३ ऑक्टोबरला झालेली कारवाई बनावट असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तींची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसिद्ध झाली आहेत, त्यातील के.पी.गोसावी नावाची व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याचे खुद्द एनसीबीने स्पष्ट केलं आहे. तसेच अरबाजला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आलं आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात आर्यन व अरबाजला अटक केली, याचा खुलासा एनसीबीने केला पाहिजे, अशी मागणी मलिक यांनी के ली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केंद्रीय यंत्रणांनी अटकेचे अधिकार दिले आहेत का, असा सवाल त्यांनी केला आहे.
एनसीबी कारवाईशी संबंध नाही – भाजपाचे स्पष्टीकरण
राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभागाने (एनसीबी) केलेल्या कारवाईशी भाजपचा कोणताही संबंध नसून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला तुरुंगवास घडल्याने आलेल्या वैफल्यातून त्यांनी हे आरोप केले असल्याचे प्रत्युत्तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले.
दरम्यान, मनीष भानुशाली यांनी भाजपशी आपला २०१२ नंतर कोणताही संबंध नसल्याचे आणि एनसीबीच्या कारवाईत सहभाग नसल्याचे प्रसिद्धीमाध्यमांपुढे स्पष्ट केले. अमली पदार्थांमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होते. या पार्टीबाबत माहिती मिळाल्यावर ती एनसीबीला दिली होती. मी कारवाईसाठी नाही, तर जबाब देण्यासाठी एनसीबीकडे गेलो होतो, असा दावा भानुशाली यांनी केला.