पुणे जिल्हा म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार असे समीकरण असले तरी
जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी योग्य उमेदवार शोधताना राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने कोणी उमेदवारी स्वीकारण्यास तयार होईना, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागावर शरद पवार यांचे वर्चस्व असून, त्यांचा शब्द या भागात प्रमाण मानला जातो. असे असले तरी आधीचा खेड व नंतर शिरुर या मतदारसंघात गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा निभाव लागू शकलेला नाही. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या निवडणुकीत तर सहाही विधानसभा मतदारसंघांत आघाडी घेतली होती. खासदारांचे संख्याबळ वाढविण्यासाठी बालेकिल्ल्यातील जागांवर राष्ट्रवादीने यंदा लक्ष केंद्रित केले आहे. शिरुरची जागा जिंकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असला तरी येथे प्रभावी उमेदवाराची अद्यापही शोधाशोध सुरू आहे.
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो. गेल्या वेळीही वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण दिल्लीपेक्षा मुंबई बरी म्हणून त्यांनी निवडणूक लढविण्याचे टाळले होते. विधानसभा अध्यक्षपद असल्याने यंदा त्यांच्या नावाचा विचार पक्षाने केलेला नाही.
जुन्नरचे आमदार वल्लभ बेनके यांनी निवडणूक लढवावी, अशी शरद पवार यांची इच्छा असली तरी स्वत: बेनके मात्र अजिबात तयार नाहीत. गेल्या वेळी विलास लांडे यांचा निभाव लागला नव्हता. त्यांचा यंदा विचार झालेला नाही.  राष्ट्रवादीकडे योग्य किंवा प्रबळ उमेदवार नसल्यानेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिरुरमधून शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले आहे. गेल्याच वेळी शिरुरमधून शरद पवार लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण पवार यांनी माढा मतदारसंघाचा आधार घेतला होता. शिरुर मतदारसंघावर मुंबईचा अधिक पगडा असल्याने हा मतदारसंघ पुणे जिल्’ाातील असला तरी त्याचे राजकारण मुंबईच्या कलाने चालते, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा