मंत्री अनिल परब, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ या महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर किरीट सोमय्या यांना ७२ तासांत माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, ७२ तासांत किरीट सोमय्यांकडून कोणतीही हालचाल न झाल्यामुळे अनिल परब यांनी मुंबई उच्च न्यायालयात तब्बल १०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकला. त्यानंतरही किरीट सोमय्या आक्रमकपणे महाविकास आघाडीत नेत्यांवर आरोप करतच आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस किरीट सोमय्या यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमय्या जवाब दो ही मोहिम सुरु केली आहे. गेल्या काही वर्षात सोमय्या यांनी भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यांच्याबाबत काय झाले याबाबत विचारणारे बॅनर्स मुंबईत लावण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने मुंबईत किरीट सोमय्यांविरोधात मोहिम राबवण्यात येत आहे. मुंबईत ‘किरीट सोमय्या जवाब दो’ ही मोहीम राबविण्यात आली आहे. मागच्या काही वर्षात सोमय्या यांनी सध्या भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याचं पुढं काय झालं? असा सवाल या मोहिमेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला आहे.

मुंबईत मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यावर किरीट सोमय्या जवाब दो अशा आशयाची वाक्ये लिहिण्यात आली आहेत. नारायण राणे, कृपा शंकर सिंह, विजयकुमार गावित आणि बबनराव पाचपुते यांच्या भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. किरीट सोमय्या यांनी या नेत्यांच्या विरोधात तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. त्यानंतर आता या नेत्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जुन्या तक्रारींविषयी काय झाले असा सवाल या बॅनरवरून विचारण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp posters asking bjp mp kirit somaiya old complaints filed against narayan rane kripa shankar singh now in bjp abn
Show comments