शरद पवारांनी मंगळवारी ( २ मे ) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं घोषित केल्यानंतर एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी अचानक घेतलेल्या निर्णयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्त्यांना एकच धक्का बसला होता. तेव्हा पुढील अध्यक्ष निवडीसाठी शरद पवारांनी एका समितीची नेमणूक केली होती. या समितीची आज ( ५ मे ) बैठक पार पडली.
या समितीच्या बैठकीत शरद पवारांचा राजीनामा नेत्यांनी एकमताने फेटाळून लावला आहे. शरद पवारच अध्यक्ष राहणार, असा बैठकीत ठराव मंजूर करण्यात आला. यानंतर या समितीतील नेत्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे आपला निर्णय शरद पवारांना कळवला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शरद पवार विचार करून निर्णय कळवणार असल्याची माहिती दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा : किमान लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवारांनी राजकारणात राहावं; संजय राऊतांची अपेक्षा
जयंत पाटील म्हणाले, “देशातील विविध नेत्यांचा आग्रह आणि राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचा शरद पवारांवर विश्वास आहे. त्यामुळे शरद पवारांनी कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष राहिले पाहिजेत, ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे. समितीचा झालेला ठराव शरद पवारांच्या कानावर घातला आहे. त्यावर ‘विचार करून सांगतो,’ असं शरद पवारांनी म्हटलं आहे.”
शरद पवार कधीपर्यंत निर्णय जाहीर करणार? यावर जयंत पाटलांनी सांगितलं, “शरद पवारांनी समितीतील सर्वांचं मत ऐकून घेतलं आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली आहे, लवकरात लवकर निर्णय द्यायला हवा. कारण, महाराष्ट्र आणि देशातील कार्यकर्ते निर्णयाची वाट पाहात आहेत.”
शरद पवारांनी निर्णय अमान्य केला, तर कोणता पर्याय असणार आहे? असं विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटलं, “शरद पवारांच्या ऐवजी कोणताही विकल्प असणार नाही आहे. यावर कोणतीही चर्चा झाली नाही.”
हेही वाचा : शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला, अध्यक्षपदाचा पेच कायम; धनंजय मुंडे म्हणतात, “पक्षातील लोकशाहीत…”
बैठकीत कार्याध्यक्ष नेमण्याबाबत चर्चा झाली का? यावर जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “कार्याध्यक्ष नेमण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. फक्त शरद पवारच अध्यक्ष राहिले पाहिजेत, हा आग्रह झाला. तो आग्रह शरद पवारांकडे केला आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.