मुंबई : विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८ आणि ९ जानेवारी रोजी आढावा बैठक बोलाविली आहे. पक्षाची पुढील दिशा यशवंतराव चव्हाण सेेंटर येथे होणाऱ्या या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. या बैठकीला पक्षाचे आजी-माजी आमदार, खासदार, विधानसभेचे उमेदवार, जिल्हाध्यक्ष, पक्षाच्या विविध आघाडीचे प्रमुख, तालुका अध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकारी निमंत्रित आहेत.
पहिला दिवस युवा, विद्यार्थी आणि महिला आघाडीसाठी असेल. दोन्ही दिवस पक्षाध्यक्ष शरद पवार सर्व बैठकांना हजर राहणार आहेत. पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर उमेदवारांच्या दोन बैठका घेतल्या आहेत. मात्र विधानसभा निवडणुका, मतदान यंत्रावरचे आक्षेप, पक्षाच्या पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रासंदर्भात उच्च न्यायालयात करायच्या याचिका, सरकारी योजनांचा मतदानांवरील परिणाम आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यावर दोन दिवसांच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
हेही वाचा…वजनदार पत्र्यामुळे समृद्धी महामार्गावर वाहने पंक्चर, २० हून अधिक गाड्या पडल्या बंद
राष्ट्रवादी पक्षाचे ८ खासदार आणि १० आमदार आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद हे तीन वर्षांसाठी आहे. मात्र जयंत पाटील हे पक्षाचे गेली सात वर्षे प्रदेशाध्यक्ष आहेत. या बैठकीत नवा प्रदेशाध्यक्ष त्याबरोबरच पक्षाचा विधिमंडळ नेता निवडण्यात येईल अशी चर्चा आहे. मात्र त्यात तथ्य नसल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.