मुंबई : महाविकास आघाडीकडे बहुमत असतानाही राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षाचे मंत्री व वरिष्ठ नेते यांच्या बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे समजते. आता विधान परिषद निवडणुकीत विशेष खबरदारी घेतली जावी, अशा सूचना त्यांनी नेत्यांना केल्याचे सांगण्यात येते.

राज्यसभा निवडणुकीत आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा भाजपच्या उमेदवाराकडून पराभव झाला. सत्ताधारी आघाडीसाठी ही नामुष्की असल्याचे मानले जाते. सोमवारी शरद पवार यांनी बोलावलेल्या पक्षाचे मंत्री व नेत्यांच्या बैठकीत राज्यसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.

संजय पवार हे शिवसेनेचे उमेदवार असले तरी त्यांना महाविकास आघाडीचा पािठबा होता. त्यांचा पराभव झाल्याबद्दल पवार यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. मात्र आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.

संजय राऊत यांच्याबद्दल रोष

राज्यसभा निवडणुकीतील पराभवाबद्दल आघाडीला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांवर जाहीरपणे संशय व्यक्त करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याबद्दल काही मंत्र्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे कळते. पुढे विधान परिषद निवडणूक आहे, अशा वेळी अपक्षांना नाराज केले तर त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे समजते.