मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी कुणाला नवीन मित्र जोडायचे हा त्यांना अधिकार आहे, परंतु जोडलेले मित्र शेवटपर्यंत म्हणजे निवडणुकीतही बरोबर राहतील का, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी काहीशी सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना-वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत घेतली आहे. मात्र त्याचबरोबर मागे जे घडले असेल ते विसरूनच पुढे जायचे असते अशी तयारीही वंचित आघाडीबाबत राष्ट्रवादीने दर्शविली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत, विधान परिषदेच्या निवडणुका, चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय भूमिका असावी, याबाबत चर्चा झाल्याची माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली, त्यावर बोलताना पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कोटय़ातून कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे .राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या, याला काही अर्थ नसतो. येणाऱ्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती-आघाडी होते त्या वेळी ‘मागचे झाले गेले गंगेला मिळाले’ अशी भूमिका घेऊन पुढे गेलो, तरच योग्य गोष्टी घडतात असे त्यांनी सांगितले.
शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही, परंतु नवे मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील व निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
पोटनिवडणुकीबीबत एकत्रित निर्णय
विधानसभेच्या कसबा व चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रित बसून करतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.