राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. शरद पवार अचानक राज्यपालांच्या भेटीला पोहोचल्याने वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शनिवारी अशाच पद्धतीने राज्यपालांची भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवारांच्या भेटीमागे राजकीय कारण असावं अशी शक्यता वर्तवली जात होती. पण ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं की, “बरेच दिवस राज्यपाल आणि शरद पवारांची भेट झाली नव्हती. राज्यपालांनी शरद पवारांना चहासाठी निमंत्रण दिलं होतं. ही फक्त सदिच्छा भेट होती. यावेळी कोणताही राजकीय विषय नव्हता. राज्यपालांनी शरद पवारांना आपण कधी वेळ मिळाल तर चहासाठी या असं सांगितलं होतं, त्यानुसार आज शरद पवार भेटीला पोहोचले”.

“करोनाच्या परिस्थितीवर साधारण चर्चा झाली. पण कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी ही चर्चा नव्हती. फक्त माहितीसाठी काही चर्चा झाली,” असंही त्यांनी सांगितलं. भाजपा नेत्यांनी शरद पवारांना मध्यस्थी करण्याची विनंती केली असल्याच्या प्रश्नावर बोलताना सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची शरद पवारांची इच्छा नसते असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

दरम्यान पियूष गोयल यांनी रात्री उशिरा ट्विट करुन महाराष्ट्र सरकारकडे प्रवाशांची यादी मागितल्यावरुन सध्या टीका सुरु असल्याच्या प्रश्नावर बोलताना रेल्वे मंत्रालयासमोरही खूप मोठं आव्हान आहे. आम्ही कोणतीही टीका करत नाही. सगळेजण काम करत आहे. आपण कामाचं कौतुक केलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp sharad pawar meets governor bhagat singh koshyari sgy