राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील आंदोलन प्रकरणी अटकेत असलेल्या वकील गुणरत्न सदावर्तेंना दिलासा मिळाला आहे. गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत ११५ आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुंबई सत्र न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार आणि सर्व ११५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्यासहित अटक करण्यात आलेल्या ११५ एसटी कामगारांच्या जामीन अर्जावर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.
सातारा कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
गुणरत्न सदावर्तेंना सोमवारी सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मराठा आरक्षण प्रकरणी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका असलेल्या सदावर्तेंना चार दिवसांपूर्वीच न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली होती, त्याची मुदत संपल्यानं सोमवारी शहर पोलिसांनी सदावर्तेंना सातारा न्यायालयात हजर केलं होतं आणि त्यानंतर तपासाच्या दृष्टीनं सातारा पोलिसांनी न्यायालयात पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने निर्णय जाहीर केला.
VIDEO: अटकेत असलेल्या गुणरत्न सदावर्तेंचं गाढव ठरतंय चर्चेचा विषय, तुम्ही पाहिलंत का?
गुणरत्न सदावर्तेंनी उडवली उदयनराजेंच्या स्टाईलने कॉलर; व्हिडीओ व्हायरल
दोन वर्षांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एका खासगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना निर्माण झाली होती. दरम्यान, सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते गैरहजर राहिल्यानं सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणात ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला होता. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही गुन्हा दाखल झाला आहे.
कोल्हापूर पोलिसांकडे ताबा
गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा आता कोल्हापूर पोलिसांकडे देण्यात आला आहे. शाहूपूरी पोलीस ठाण्यात मराठा समाजाबद्दल द्वेष पसरवल्याप्रकरणी सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोल्हापूर पोलिसांनी याप्रकरणी सदावर्तेंची ताब्यात घेऊन चौकशी करण्याकरता गिरगाव कोर्टात रितसर अर्ज केला होता. त्यानुसार सदावर्ते यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांना देण्यात आला.