आगामी निवडणुकीत २२ जागा लढविण्याची तयारी केलेल्या राष्ट्रवादीने माढा, बीड आणि शिरुर वगळता बाकीच्या सर्व उमेदवारांची नावे निश्चित केली आहे. शिरुर मतदारसंघातून विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना रिंगणात उतरविण्यात यावे, असा प्रस्ताव असला तरी वळसे-पाटील यांनी मात्र नकार दिल्याचे समजते.
उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांबरोबर अनेकदा चर्चा केली आहे. आतापर्यंत १५ मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. पवार यांच्या माढा मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची याचा पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्याचे घाटत असताना सोलापूर जिल्ह्यातील काही नेत्यांनी मोहिते-पाटील यांना विरोध दर्शविला आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिरुरमध्ये विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांना उमेदवारी देण्याची योजना असला तरी स्वत: वळसे-पाटील हे लोकसभा लढण्यास उत्सूक नाहीत. पुणे जिल्ह्यातच राष्ट्रवादीला उमेदवाराची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे.
रावेर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. खासदार ईश्वर जैन यांचे आमदार पूत्र मनीष यांना राष्ट्रवादीकडे जागा राहिल्यास राष्ट्रवादीने उमेदवारी द्यावी, अथवा काँग्रेसकडून लढावे, असा पर्याय ठेवण्यात आला. पण मनीष जैन यांना उमेदवारी देण्यास राष्ट्रवादीत विरोध झाला आहे. त्याऐवजी अरुण गुजराथी यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावरूनही पक्षात एकमत झालेले नाही.
सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, संजीव नाईक, संजय पाटील, उदयनराजे भोसले, डॉ. पद्मसिंह पाटील या विद्यमान खासदारांबरोबरच छगन भुजबळ, मुन्ना महाडिक, सूर्यकांता पाटील, आदी उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. एक-दोन ठिकाणी उमेदवार बदलले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले. काँग्रेसबरोबरची जागावाटपाची चर्चा पूर्ण झाल्यावरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader