राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला. यानंतर त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिली प्रतिक्रिया देत आयोगाच्या या निर्णयावर पक्षाची भूमिका मांडली. यात त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सुधारून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा पुन्हा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. ते मंगळवारी (११ एप्रिल) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षात याबाबत सुनावणी झाली. यात आम्ही आमची बाजू मांडली होती. परंतू आता निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. या देशातील कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात याविषयीच्या निकषात प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतात. आगामी काही राज्यांच्या निवडणुकांमध्ये आमची कामगिरी सरस/समाधानकारक झाली तर हा दर्जा पुन्हा मिळू शकतो. त्यात मला फार अडचण वाटत नाही.”

“या निर्णयावर मतमतांतरं आहेत”

“निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय देशातील इतर पक्षांबाबतही घेतला आहे. यात जुना असलेल्या कम्युनिस्ट पक्षाचाही समावेश आहे. या निर्णयावर मतमतांतरं आहेत, मात्र आता निर्णय झाला आहे. यावर आमची केंद्रीय पक्ष समिती योग्य तो विचार करत आहे. आमच्या पक्षाचे केंद्रीय कार्यालय याबाबत माहिती घेऊन काम करत आहे,” असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं.

“आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही”

जयंत पाटील पुढे म्हणाले, “आमच्या पक्षाच्या चिन्हाला धक्का लागेल असं वाटत नाही. घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह कायम राहील. याबाबत माझ्या मनात शंका नाही. महाराष्ट्रापुरता हा विषय बघितलं, तर या चिन्हाला कोणताही धक्का लागत नाही असं दिसतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा याची आम्हाला चिंता नाही.”

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, भाजपा-शिंदे गटाकडून प्रतिक्रिया म्हणाले, “मला वाटतं हा आजच…”

“…आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल”

“अन्य राज्यात निवडणुका झाल्यावर आमची परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल,” असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp state president jayant patil first reaction on ec decision about national party status pbs