Mumbai Mahamorcha: महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल करत राज्यपालांना लक्ष्य केलं आहे.
सुप्रिया सुळेंनी वारंवार सत्ताधारी पक्षातील लोकांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांचा यावेळी समाचार घेतला. “एखाद्याने कुठली चूक एकदा केली ठीक आहे, दोनदा केली तर ठीक आहे. पण पुन्हा पुन्हा चूक कशी होते? ती चॉईस असते, मग ती चूक नसते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“…तेव्हा महाराष्ट्रातील सत्ताधारी चुपचाप होते”
दरम्यान, यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी केलेल्या वक्तव्यांवरून सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. “राज्यपालांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही. त्यामुळे निवडकपणे दिलगिरी व्यक्त केली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्रीही एवढा हल्लाबोल करत असताना महाराष्ट्रातल्या कुणी काहीही केलं नाही. सगळे चुपचाप बसले होते. आम्ही गेलो होतो अमित शाह यांच्याकडे. खरंतर अमित शाह यांचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी मध्यस्थी केली. नाहीतर आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हातावर हात ठेवून बसले होते. त्यांनी दिल्लीला जायला नको होतं का?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.
“…ये नहीं चलेगा!”
“आपले मंत्री कर्नाटकला जाणार होते, मग त्यांचा दौरा रद्द का केला? कारण ते घाबरतात.बोटचेपी भूमिका स्वीकारली आहे. त्यांना स्वाभिमान नाहीये. त्यांना फक्त सत्ता हवीये.त्यासाठी ते काहीही करतील.महाराष्ट्रच नव्हे, भारतातल्या कुठल्याही महापुरुषाबाबत कुणी चुकीचं काही बोलत असेल, तर ते वाईटच आहे. आपण सगळ्यांनी मिळून त्याचं खंडन केलं पाहिजे. कुणीही यावं आणि टपली मारून जावं. नही चलेगा”, असा इशारा यावेळी सुप्रिया सुळेंनी दिला.
चंद्रकांत पाटलांना सुनावलं!
दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरही सुप्रिया सुळेंनी यावेळी तोंडसुख घेतलं. “हे दुर्दैवी आहे की लोक कसा विचार करतात. तुम्ही कसं बोलता, त्यावरून तुमची वैचारिक बैठक काय आहे हे कळतं. भीक मागायचे असं बोलणं म्हणजे संबंधित व्यक्तीला लहान दाखवणं असतं. पण त्याचवेळी लोक भीक मागतात म्हणून त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलणंही वाईट आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी असं बोलणं तर अत्यंत लाजिरवाणी बाब आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“भाजपाला सुसंस्कृत पक्ष समजत होते”
“भाजपाला मी आत्तापर्यंत सुसंस्कृत पक्ष समजत होते. मी स्वत: भाजपाला अनेक वर्षं जवळून पाहिलं आहे. प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली यांची भाषणं आम्ही संसदेत ऐकायचो आणि त्याच्या नोट्स काढायचो. कारण ते इतके उत्तम वक्ते होते. त्यांच्यासारखं आपलं भाषण कधीतरी व्हावं असा आमचा प्रयत्न असायचा. पण एवढी शिस्त असणाऱ्या पक्षाला काय झालंय, हे मला माहिती नाही. भाजपा सुसंस्कृत पक्ष होता, तो तसा राहिलेला नाही. सत्ता येत जात असते, पण राज्याची आणि देशाची संस्कृती राहिली पाहिजे”, असं त्या म्हणाल्या.