शिंदे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा आणि शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर शीतल म्हात्रेंच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. यानंतर या व्हिडीओवर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनीही प्रतिक्रिया देत शीतल म्हात्रेंनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंचा मॉर्फ फोटो शेअर केल्याचा आरोप केला. तसेच जे पेराल, तेच उगवेल, असं म्हणत टीका केली.
सुरज चव्हाण म्हणाले, “खरंतर त्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु, शीतल म्हात्रेंनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, त्यांनी जे पेरलं, तेच आज उगवलं आहे. कारण काही महिन्यांपूर्वी याच शीतल म्हात्रेंनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर सुप्रिया सुळे बसलेला एक फोटो व्हायरल केला होता.
हेही वाचा : VIDEO: “आमदार प्रकाश सुर्वेंबरोबरचा व्हिडीओ ‘मॉर्फ’”, शीतल म्हात्रे म्हणाल्या, “विकृत नजरेने…”
व्हायरल व्हिडीओवर शीतल म्हात्रे काय म्हणाल्या?
शीतल म्हात्रे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”
पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये शीतल म्हात्रे म्हणाल्या, “एखादा पुरुष राजकारणात स्त्रिला कसं वागवतो याचे मला अनुभव आले आहेत. मी माझ्या आत्मसन्मानासाठी माझी जीव आणि करियर सर्व पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसलं की असे प्रकार केले जातात.”
“आज हे व्हिडीओ व्हायरल करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचं नातं असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कुणाचं डोकं आहे आणि कोण करतंय याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे,” असं मत शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केलं.
शीतल म्हात्रेंनी रात्री उशिरा पोलीस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दिली. त्यावेळी त्या म्हणाले, “मीही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सुन आहे आणि कुणाची तरी बायको आहे. यांच्याही घरात आई-बहिणी असतील. असं असूनही एखाद्या महिलेसंदर्भात एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोललं जातंय, खोटे व्हिडीओ टाकले जात आहेत. विरोधक एका महिलेबाबत असं वागू शकतात यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत.”
“याच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. आम्ही त्याविरोधात दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहोत. रात्रीचे पावणेतीन वाजले आहेत आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथं आहेत. व्हिडीओ पोस्ट करणारे बरेचजण युवासेनेचे कार्यकर्ते आहेत,” असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला.