राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने यावेळी मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करून मुंबईतील सर्व पंचतारांकीत हॉटेल्समध्ये मराठी वृत्तवाहीन्या दाखविणे बंधनकारक करावे अशी मागणी करणारे पत्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेऊन सदर पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहीले आहे.
राज्याची मराठी ही मातृभाषा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिला जाऊ नये. पंचतारांकीत हॉटेल्सने महाराष्ट्राच्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार, पंचतारांकीत हॉटेल्स मराठी वृत्तवाहिन्या आणि कार्यक्रम यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पंचतारांकीत हॉटेल्समध्ये येणाऱया ग्राहकांना मराठी वाहिन्या आवडत नाहीत असे हॉटेल्स मालकांनी गृहीत धरणे चुकीचे आहे. कोणत्या वाहिन्या बघाव्यात किंवा बघू नयेत हे ग्राहकांना ठरवू द्यावे. हॉटेल मालकांनी सर्व वाहिन्या दाखविणे बंधनकारक असले पाहिजे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
यावर शिवसेनेचे खासदार भरतकुमार राऊत राष्ट्रवादीवर टीकेचा सुर धरत म्हणाले, इतक्या वर्षानंतर राष्ट्रवादीला मराठी भाषेसाठी पुढाकार घेण्यासाठी जाग आली आहे. जर त्यांना मराठीची इतकी काळजी आता वाटू लागली असेल, तर त्यांनी सरकारवर दबाव आणून येत्या चोवीस तासात हा निर्णय बंधनकारक करावा.