आज वाय बी चव्हाण सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी शिंदे गटासह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्धव ठाकरे भाषण करत असताना सभागृहात एक आगळीवेगळी घटना घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर “देश का PM कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. शरद पवारांना पंतप्रधान बनवण्यास काहीही हरकत नाही. पण आधी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा. आधी गावपातळीवर एकत्र येऊन दाखवा, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं.

हेही वाचा- “सर्वोच्च न्यायालय हाच एकमेव आशेचा किरण”, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल!

महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही नेतेमंडळी तर भेटत असतो. पण तुम्हालाही गावपातळीवर तिन्ही पक्षाला एकत्र भेटावं लागेल. आपण जर लढणार असू आणि लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर असेल तर पहिली शपथ घ्या… येथे आपल्या पक्षाच्या पदरात काही पडलं नाही तरी चालेल. पण ग्रामपंचायत असो वा एखाद्या सोसायटीची निवडणूक असो भाजपा आणि मिंधे गटाबरोबर युती करायची नाही. ही पहिली तयारी करा.

हेही वाचा- ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश

उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो” अशी घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांची घोषणा ऐकताच उद्धव ठाकरे म्हणाले, “काही हरकत नाही. पण सगळे एकत्र येऊन लढा. नाहीतर आपण तुझं-माझं करत बसू… त्यामुळे आपण इकडेच राहू आणि घोषणा देणारेही इकडेच राहतील. पंतप्रधान पद मिळवणं हे फार मोठं स्वप्न आहे. आधी गाव पातळीवर एकत्र येऊन दाखवा. गावपातळीवर एकत्रित झालो की पुढचं सगळं काम सोपं होईल.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp worker slogan next pm will be sharad pawar uddhav thackeray gave reaction mva meeting rmm