मुंबई : दिवंगत कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील एन.डी. स्टुडिओ अखेर शासनाच्या ताब्यात आला आहे. या स्टुडिओच्या व्यवस्थापनाची जबाबदारी गोरेगाव येथील चित्रनगरीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी गुरुवारी एन.डी. स्टुडिओला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली.
स्टुडिओचे व्यवस्थापन दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
हेही वाचा – लहान मुलांमध्ये लघुदृष्टिदोष मोबाइलचा बेसुमार वापर; मैदानी खेळांचा कंटाळा
स्टुडिओच्या पुनर्रचनेसंदर्भात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सादर केलेल्या आराखड्याला राष्ट्रीय कंपनी विधि प्राधिकरणाने (एनसीएलटी) १४ नोव्हेंबर २०२४ रोजी मान्यता दिली. यापुढे स्टुडिओचे दैनंदिन प्रशासन, सुरक्षा, चित्रीकरणे, महसूल वाढ, लेखाविषयक कामे महामंडळाच्या नियंत्रणाखाली सुरू राहणार आहेत.
सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, उपसचिव महेश व्हावळ, मुख्य लेखावित्ताधिकारी चित्रलेखा खातू-रावराणे, विशेष कार्यकारी अधिकारी संजय कृष्णाजी पाटील, कक्ष अधिकारी अनिरुद्ध देशपांडे यांनी एन. डी. स्टुडिओची पाहणी केली.
कर्जतमधील आकर्षणाचे केंद्र
गोरेगाव येथील चित्रनगरीनंतर एन. डी. स्टुडिओ हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आणि चित्रपटप्रेमींना स्टुडिओतील वातावरण अनुभवण्यासाठी आकर्षणाचे केंद्र ठरला होता. मात्र स्टुडिओवर असलेल्या कर्जाला कंटाळून देसाई यांनी २०२३मध्ये आत्महत्या केली. त्यापूर्वी स्टुडिओ जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. हा स्टुडिओ जमीनदोस्त होऊ नये अशी इच्छा समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत होती. अखेर हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घेतला आहे.