२ ऑक्टोबर रोजी सिनेअभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबईतल्या एका क्रूझवरून एनसीबीनं ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. आर्यन खानला ड्रग्जसोबत ताब्यात घेतल्याचं एनसीबीनं नंतर पत्रकार परिषदेत देखील जाहीर केलं आहे. मात्र, गेल्या ५ दिवसांपासून एनसीबीची बाजू जाहीर होत असताना आता पहिल्यांदाच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची बाजू समोर आली आहे. आर्यन खानच्या एनसीबी कोठडीची मुदत आज संपत होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खाननं त्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगितला आहे. तसेच, आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचा दावा आर्यन खाननं केला आहे. हिंदुस्थान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि त्यांच्यासोबत अटक करण्यात आलेल्या ६ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आर्यननं जामिनासाठी वकील सतीष मानेशिंदे यांच्यामार्फत अर्ज दाखल केला. मात्र, न्यायालयाची वेळ संपल्यामुळे या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आर्यनला आजची रात्र न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे. मात्र, आजच्या सुनावणीमध्ये आर्यन खाननं आपली बाजू मांडताना अनेक दावे देखील केले आहे. अर्थात, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्यातील सत्यासत्यता समोर येऊ शकेल.

“प्रतीक नावाच्या मित्राने मला बोलावलं”

न्यायालयात आर्यन खाननं वकील सतीश मानेशिंदे यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. “मला प्रतीक गाबा नावाच्या एका मित्राने पार्टीसाठी बोलावलं होतं. त्यानेच सगळं कोऑर्डिनेट केलं होतं. मी बॉलिवुडमध्ये आहे म्हणून कदाचित मला तिथे ग्लॅमरसाठी बोलावण्यात आलं असावं”, असं आर्यननं आपल्या खुलाशात म्हटलं आहे.

“मोबाईल चॅट्समध्ये रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही”

दरम्यान, आपण प्रतीकसोबत केलेल्या मोबाईल चॅट्समध्ये कुठेही रेव्ह पार्टीचा उल्लेख नसल्याचा दावा आर्यनने कोर्टात केला आहे. “प्रतीक आणि माझ्यात मोबाईल चॅटमधून बरंच संभाषण झालं. पण त्यामध्ये कुठेही रेव्ह पार्टी किंवा ड्रग्ज घेण्यासंदर्भात उल्लेख नाही. आम्ही फक्त क्रूझवर होणाऱ्या इव्हेंटविषयी बोललो. प्रतीक गाबा हा अरबाझचा देखील मित्र आहे आणि त्याला देखील प्रतीकनेच पार्टीसाठी बोलावलं होतं”, असं आर्यनने सांगितलं आहे.

“मी आणि अरबाज एकत्र नव्हतोच”

आपण अरबाजसोबत क्रूजवर गेलोच नव्हतो, असा दावा देखील आर्यन खाननं केला आहे. “मी तिथे गेटवर पोहोचलो तेव्हा मी अरबाझला पाहिलं. आम्ही एकमेकांना ओळखतो, त्यामुळे मी त्याच्याशी बोललो. तिथेच आम्ही एनसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटलो. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मला विचारलं की माझ्याकडे ड्रग्ज आहे का. मी सांगितलं नाही. त्यांनी मला तपासलं. पण त्यांना काहीही सापडलं नाही. नंतर त्यांनी अरबाजला तपासलं आणि मला एनसीबी ऑफिसला यायला सांगण्यात आलं. अरबाझ हा माझा मित्र आहे, मी ते नाकारत नाही. त्यानं स्वत:च हे सांगितलं आहे की तो एकटाच त्या ठिकाणी गेला होता. आम्ही क्रूजवर जाण्यासाठी एकत्र नियोजन केलेलं नव्हतं. मला तर तो तिथे येत आहे हे देखील माहिती नव्हतं”, असं आर्यन खाननं न्यायालयात सांगितलं आहे.

Aryan Khan Bail Hearing: आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि इतर ६ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

“२ ऑक्टोबरपासून चौकशीत प्रगती नाही”

२ ऑक्टोबरला अटक झाल्यापासून चौकशीमध्ये कोणतीही प्रगती झालेली नसल्याचा दावा देखील आर्यन खाननं कोर्टात केला. “२ ऑक्टोबरला आम्हाला ताब्यात घेतल्यापासून या तपासात कोणतीही प्रगती झालेली नाही. मी सुरुवातीला एक दिवसाच्या रिमांडसाठी स्वत:हून तयार झालो. दुसऱ्यावेळी त्यांनी ७ दिवसांची कस्टडी मागितली. आम्हाला वाटलं की तपास पुढे सरकेल, पण काहीही झालं नाही”, असं आर्यननं वकील सतीश मानेशिंदे यांच्या माध्यमातून कोर्टाला सांगितलं.

आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सतिजा, इशमीत सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा अशी एनसीबीनं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या सगळ्यांना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ndps court mumbai aryan khan in judicial custody disagree all charges pmw
Show comments