लोकपालावर सडकून टीका करीत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी, देशाला जोपर्यंत स्वच्छ चारित्र्याचे नेते मिळत नाहीत तोपर्यंत भ्रष्टाचाराच्याच गर्तेत देश अडकलेला असेल. लोकपालामुळे ताबडतोब भ्रष्टाचार संपणार नाही. लोकपालच भ्रष्टाचारी निघाला तर, असा प्रश्न करून, चारित्र्यवान नेत्यांची निवड करा आणि देशात विकासाचे चित्र पाहा, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री पर्रिकर डोंबिवलीत एका कार्यक्रमासाठी आले होते. महापौर कल्याणी पाटील, खासदार आनंद परांजपे, पालिका आयुक्त शंकर भिसे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमातील उपस्थित सर्वपक्षीय नेत्यांसमोर बोलताना, बुहतांशी राजकीय नेत्यांमध्ये स्वच्छ चारित्र्याचा अभाव आहे. चारित्र्य नाही तेथे विद्या, सरस्वती आणि लक्ष्मी थांबत नाही. देशाच्या नेतृत्वामध्ये चारित्र्याचा अभाव असेल तर बहुतांशी प्रश्न त्यामुळे निर्माण होतात. देशातील आताची परिस्थिती ही त्याचीच शोकांतिका आहे, अशी टीका पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारचा नामोल्लेख टाळून त्यांनी केली.  
विचार हा एक भ्रष्टाचाराचा भाग आहे. तो दोन दिवसांत नष्ट होत नाही. राजकीय व्यवस्थेतील सकारात्मक बदल, स्वच्छ चारित्र्याचे नेते हे लोकपालापेक्षा अधिक सक्षम व प्रभावीपणे काम करू शकतात. गोव्यात लोकोपयोगी, विकासाची अनेक कामे करून आम्ही ते सिद्ध करून दाखविले आहे, असे मुख्यमंत्री पर्रिकर म्हणाले.
तरुण तेजपाल प्रकरणात पोलीस चौकशी सुरू आहे. त्यामध्ये गोवा सरकारचा अजिबात हस्तेक्षप नाही. महाराष्ट्रात, विशेषत: डोंबिवलीत, पाऊल ठेवल्यावर सर्वत्र दरुगधी आणि कचऱ्याचे साम्राज्य दिसले. ते प्रथम साफ करा, असे पत्रकारांच्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

Story img Loader