प्रत्यक्षात उपनगरातील सुमारे ६०० गाळे उपलब्ध – उपनगरात जाण्यास रहिवाशांचा विरोध होण्याची शक्यता

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईमधील उपकरप्राप्त इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचे (स्ट्रक्चरल ऑडीट) काम हाती घेतले असून नजिकच्या काळात अतिधोकादायक इमारतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांच्या निवाऱ्यासाठी संक्रमण शिबिरात मोठ्या प्रमाणावर गाळे उपलब्ध करावे लागणार आहेत.

मात्र प्रत्यक्षात मंडळाकडे उपनगरांमधील संक्रमण शिबिरातील सुमारे ६०० गाळेच उपलब्ध आहेत. मात्र शहरातील रहिवासी उपनगरांमध्ये जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना शहरातील संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करणे आणि अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्याचे मोठे आव्हा मंडळासमोर आहे.

१४ हजार इमारतींची संरचनात्मक तपासणी

जुन्या-मोडकळीस आलेल्या धोकादायक अशा अंदाजे १४ हजार इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी म्हाडाच्या दुरुस्ती मंडळावर आहे. त्यानुसार दरवर्षी मंडळ पावसाळ्याआधी सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करीत आहे. त्या इमारती रिकाम्या करण्यात येतात. पावसाळ्यात इमारत कोसळून घटना घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असली तरी इमारतींचा पुनर्विकास शक्य तितक्या लवकर मार्गी लावणे अत्यावश्यक आहे. मात्र यासाठी ठोस धोरण नसल्याने पुनर्विकास रखडला होता. पण आता मात्र उपकरप्राप्त इमारतींसाठी नवीन पुनर्विकास धोरण लागू झाले आहे. यातील ७९ अ कलम अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे पुनर्विकासास चालना मिळणार आहे.

अतिधोकादायक घोषित झालेल्या इमारतींना ७९ अ च्या नोटीसा बजावून मालक आणि रहिवाशांना प्रत्येकी सहा महिन्यांची मुदत देऊन पुनर्विकासासाठी प्रस्ताव सादर करण्याची संधी दिला जाणार आहे. या एका वर्षाच्या कालावधीत ज्या इमारतींचा प्रस्ताव येणार नाही, त्यांच्याविरोधात भूसंपादनाची कारवाई करून म्हाडा स्वत: त्या इमारतीचा पुनर्विकास करणार आहे. त्यानुसार आतापर्यंत अंदाजे ८०० अतिधोकादायक इमारतींना ७९ अ ची नोटीसा देऊन आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.

तर दुसऱ्या टप्प्यात नोटीसा पाठविण्यासाठी म्हाडाने संरचनात्मक तपासणी करून अतिधोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने १४ हजार इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार आहे. या निर्णयाप्रमाणे सध्या एक हजार इमारतींच्या संरचनात्मक तपासणीचे उद्दीष्ट मंडळाने ठेवले आहे. टप्प्याटप्प्याने इमारतींची तपासणी करण्यात येणार आहे.

पवई, मानखुर्द, भांडूपमध्ये गाळे मंडळाच्या निर्णयानुसार एक हजारपैकी आतापर्यंत ६६६ इमारतींची संरचनात्मक तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी ५४० इमारतींचा तपासणी अहवाल सादर झाला असून यापैकी ९५ इमारतींचा सी -१ श्रेणीत अर्थात अतिधोकादायक श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. ही संख्या बरीच मोठी आणि चिंताजनक आहे. जसजशी संरचनात्मक तपासणी पूर्ण होईल तसतशी ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे मंडळाची चिंता वाढली आहे.

या अतिधोकादायक इमारती नियमाप्रमाणे रिकाम्या करून त्याचे पाडकाम करणे आवश्यक असणार आहे. दुसरीकडे ७९ अ ची नोटीस देऊन या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्याचेही आव्हान दुरुस्ती मंडळासमोर असणार आहे. दरम्यान अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेण्यासाठी ९५ इमारतींना नोटीसा बजावण्यात येत आहेत. तीन महिन्यांच्या कालावधीत रहिवाशांना घरे रिकामी करावी लागण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी मागणी केल्यास संक्रमण शिबिरातील गाळे उपलब्ध करुन देणे मंडळाला बंधनकारक असणार आहे.

अतिधोकादायक इमारतींची सध्याची आणि भविष्यातील संख्या लक्षात घेता मोठ्या संख्येने संक्रमण शिबिरातील गाळ्यांची आवश्यकता भासणार आहे. सध्या मंडळाकडे अंदाजे ६०० गाळे आहेत. तर महत्त्वाचे म्हणजे हे सर्व गाळे शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडून मंडळाला उपलब्ध झाले असून हे गाळे पवई, मानखुर्द, भांडूप या ठिकाणी आहेत, अशी माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण मुंबईतून थेट उपनगरात जाण्यास रहिवाशांचा विरोध असतो. त्यामुळे आता अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून घेणे आणि मागणीप्रमाणे संक्रमण शिबिरांतील गाळे उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान मंडळासमोर आहे.