मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे राज्य आहे. हा पुरोगामी विचारच राज्याला प्रगतिपथावर घेऊन गेला व तोच विचार राज्याच्या हिताचा आहे. परंतु मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात जात्यंध्य व धार्मिक विचाराला पुढे करून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम केले जात आहे, हा जात्यंध विचार थांबवण्याची गरज आहे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यात पुरोगामी विचार रुजलेला आहे, त्याला छेद देण्याचे काम काही लोक करत आहे. हा विचार राज्याच्या प्रगतीसाठी घातक आहे. केंद्रातील भाजप सरकारने कामगार हिताच्या कायद्यामंध्ये मोठे बदल करून त्यांना देशोधडीला लावण्याचे काम केले आहे. मुठभर भांडवलदारांच्या दावणीला बांधून कामगारांचे हक्क व अधिकार हिरावण्याचे काम केले आहे. पण कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करील.
भाई जगताप यांचे भाजपवर टीकास्त्र
ज्या भाजपच्या लोकांनी हुतात्मा चौकात जाऊन कधीही हुतात्म्यांना अभिवादन केले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांना कधीही ज्यांनी आपले मानले नाही, आज ते फक्त आपल्या राजकीय हेतूंकरिता महाराष्ट्राचा जयजयकार करत आहेत, अशी दुटप्पी भूमिका असणारे भाजपचे दुतोंडी सरकार आज केंद्रामध्ये सत्तेत आहे, अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई काँग्रेसतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमादरम्यान भाई जगताप बोलत होते.