मुंबई : भारत आणि अमेरिकेला लष्कर-ए-तोयबा, जैश, आयसिससारख्या दहशतवादी संघटनांकडून धोका असून दोन्ही देशांनी याचा एकत्र सामना केला पाहिजे. दोन्ही देश दहशतवादाविरुद्ध लढाईत एकत्र असले तरी वाढती धार्मिक कट्टरता कमी करण्यावर दोन्ही देशांनी काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतातील अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी गुरुवारी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘भारत-अमेरिका संरक्षण आणि सुरक्षा भागीदारीची भूमिका’ या विषयावर गार्सेटी यांनी ताज हॉटेलमध्ये निवडक प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते डेमोक्रेटीक पक्षाचे नेते असून २० जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष होणार असल्याने गार्सेटी यांची जागा नवा राजदूत घेईल. भारतातील दोन वर्षे अद्भभुत होती. आपण योग्य वेळी योग्य देशात आलो. भारत आपल्यासाठी सर्वात महत्वपूर्ण देश असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी वेळोवेळी म्हटल्याचे गार्सेटी यांनी यावेळी नमूद केले. भारत आणि अमेरिकेची दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकजूट आहे. दहशतवादी कारावायांतील गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये गुप्त माहितीची देवाणघेवाण होते. भारतीय आणि अमेरिकनांची स्वप्ने एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोन्ही देशांमधील संबंध हे सीमांच्या पलिकडे आहेत, असे गार्सेटी म्हणाले. उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणी झालेल्या आरोपांवर स्पष्टपणे बोलण्यास गार्सेटी यांनी नकार दिला. ‘मी यावर भाष्य करणार नाही. आमच्याकडे स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे, जी अनेक देशांपेक्षा वेगळी आहे. आम्ही येथील उद्योगपती आणि मोठ्या कंपन्यांसोबत चांगली भागिदारी निर्माण केली आहे’, एवढेच ते म्हणाले.

हेही वाचा : वाहन खरेदीवर नियंत्रण आणण्याचा परिवहन विभागाचा विचार, जपानच्या धर्तीवर नवे धोरण राबविणार

मुंबई हे बहुरंगी आणि बहुढंगी शहर आहे. हे शहर कल्पनांनी समृद्ध आहेच पण मुंबई अशा लोकांचे शहर आहे जे उद्याकडे आजपेक्षा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, या शब्दात गार्सेटी यांनी मुंबईचे कौतुक केले. जगातील अत्यंत महत्वाचे शहर असलेल्या मुंबईला आपण दोन वर्षांच्या कार्यकाळात १३ वेळा भेट दिल्याचे गार्सेटी यांनी नमूद केले.

संरक्षण सहकार्यावर भर

भारत-अमेरिकेतील संरक्षण व्यापार ३२ अब्ज डॉलरवर पोहोचला असून दोन्ही देश शास्त्रास्त्रांची संयुक्त निर्मिती करत आहेत. संयुक्त लष्करी कवायती करण्याला अमेरिकेची भारत ही पहिली पसंती आहे. प्रशांत महासागर व्यापारासाठी अधिक सुरक्षित झाला पाहीजे, त्या दृष्टीने दोन्ही देश काम करत आहेत. मेक्सिकोमधील कृत्रिम अंमलीपदार्थ तस्करीचे दोन्ही देशांसमोर आव्हान असून संयुक्त लढा चालू असल्याचे गार्सेटी यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून तरूणाचा मृत्यू, पालकांना चार लाख रुपये नुकसाभरपाई देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

बेकारीमुळे हिंसाचार वाढतो. त्यामुळे गरीब भागांना संधी देण्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागेल. जे समुदाय विकासाच्या उंबरठ्यावर आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोचले पाहिजे. आर्थिक मार्ग तयार करण्याच्या गरजेवर आपण भर दिला पाहिजे.

एरिक गार्सेटी, अमेरिकेचे राजदूत
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Need to reduce religious fanaticism appeal from us ambassador eric garcetti mumbai print news css