मुंबई: विधान परिषदेचे सदस्य म्हणून डॉ. नीलम गोऱ्हे या मूळ शिवसेना पक्षातून निवडून आलेल्या असून त्या उपसभापतीपदी शिवसेना पक्षाच्या वतीने निवडून आल्या आहेत. याबाबत विधान परिषदेच्या वार्तापत्रात प्रसिद्ध झाले आहे. त्यानंतर त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे उपसभापती गोऱ्हे या शिवसेनेतच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदीची कारवाई होऊ शकत नाही आणि त्यांना कामकाजात भाग घेण्यास अडचण नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिले .
संविधानाच्या दहाव्या अनुसूचीमध्ये सदस्यांच्या अपात्रतेविषयी तरतूद आहे. मात्र सभापती, उपसभापती यांना राजीनामा देण्याविषयी कोणतेही बंधन नाही. यापूर्वी झालेल्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या चर्चेतदेखील सभापती, उपसभापती यांनी पक्षांतर केले असेल. पदांचा राजीनामा देणे अथवा राजीनामा देऊन परत ते ज्या पक्षात गेले आहेत त्या पक्षाकडून निवडणूक लढवणे, याचा दाखला नाही. त्यामुळे गोऱ्हे यांच्या अपात्रतेचा प्रश्न निर्माण होत नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटवण्यासाठी विधिमंडळ सचिवालयास आणि राज्यपाल रमेश बैस यांना पत्र दिले आहे. यावर विधान परिषदेत चर्चा झाली.