विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले असल्याने त्या पदावर राहू शकत नाहीत, हा विरोधी पक्षांचा आक्षेप तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळे डॉ. गोऱ्हे या उपसभापतीपदावर कायम राहतील, असे स्पष्ट झाले.
शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी नीलम गोऱ्हे या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटासोबत होत्या. मात्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट) वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन डॉ. गोऱ्हे यांना अपात्र ठरवून, त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. त्याचबरोबर विधिमंडळ सचिवालयालाही तसे पत्र दिले होते.
विधान परिषदेत विरोधी पक्षांनी नीलम गोऱ्हे यांना उपसभापती म्हणून कामकाज करण्यास आक्षेप घेतला होता. चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. गोऱ्हे यांनी पक्षांतर केलेच नाही, त्या मूळ शिवसेना पक्षातच आहेत, असे सांगून विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावत भक्कमपणे त्यांची बाजू मांडली होती.
पक्षांतर केलेले नाही उपसभापती पदावरून दूर करणे आणि अपात्रतेची नोटीस या दोन वेगवेगळय़ा बाबी आहेत. अपात्रतेच्या नोटिशीचा कोणताही परिणाम त्यांच्या उपसभापतीपदी असण्यावर होऊ शकत नाही. डॉ. गोऱ्हे निवडून आल्या त्यावेळी विधिमंडळात नोंदणी असलेल्या ज्या शिवसेना पक्षाने त्यांना पाठिंबा दिला तो पक्ष त्यांनी बदललेला नाही, असे डावखरे यांनी सांगितले.