विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी रात्री मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये भेट झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि एकच खळबळ उडाली. मात्र या भेटीसंदर्भात नीलम गोऱ्हे यांनी स्पष्टीकरण देताना ही राजकीय भेट नव्हती असं स्पष्ट केलं आहे. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही तिथे उपस्थित होते हा निव्वळ योगायोग असल्याचं नीलम गोऱ्हेंनी स्पष्ट केलं आहे. निलम गोऱ्हेंना यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील मुख्यमंत्री शिंदेंबरोबरच्या भेटीबद्दल बोलताना ‘टीव्ही ९ मराठी’वर नीलम गोऱ्हेंना नारायण राणेंनी त्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याचं विधान केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. “नारायण राणे म्हणाले की निलमताई शिवसेनेत नाराज आहेत. मीच त्यांना शिवसेनेत थांबवलं नाहीतर त्या आतापर्यंत शिवसेनेत राहिल्या नसत्या,” असा प्रश्न नीलम गोऱ्हेंना विचारण्यात आला. या प्रश्नावर नीलम गोऱ्हेंनी हसत उत्तर देत आपली आणि राणेंनी त्यांनी शिवसेना सोडल्यापासून औपाचरिकच काय तर कोणत्याही कार्यक्रमामध्येही भेट झालेली नाही, असं सांगितलं. तसेच नारायण राणेंच्या या विधानावर त्यांनी सविस्तर स्पष्टीकरणही दिलं.
नक्की वाचा >> “RSS, भाजपाचा स्वातंत्र्य लढ्यात काडीइतकाही संबंध नव्हता तसा तो सावरकरांच्या…”; ठाकरेंकडून हल्लाबोल, राहुल गांधींनाही सुनावलं
“मला वाटतं चिंटूचे जोक असे जे विनोद असतात तसा हा प्रकार आहे,” असं म्हणत नीलम गोऱ्हेंनी राणेंचं विधान फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं सूचकपणे सांगितलं. “नारायण राणे आणि माझं मागील पाच-सहा वर्षांमध्ये कधी बोलणंही झालं नाही. ते २०१५-१६ च्या सुमाराला विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यावेळेला बोलताना आम्ही केवळ जय महाराष्ट्र किंवा नमस्कार वगैरे बोलायचो. एकदा भाषण झाल्यानंतर मला आणि अनिल परबांना सांगून गेले होते की चांगलं बोललात तुम्ही. यापलीकडे माझा नारायण राणेंशी काहीही संवाद नाही किंवा संपर्कही नाही. त्यामुळे त्यांना असं का भासतंय मला खरंच कल्पना नाही,” असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
नक्की वाचा >> “हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि…”; पुण्यातील ‘त्या’ प्रकारावरुन ठाकरेंनी शिंदे गटाची अक्कल काढली
“त्यांनी ज्यावेळी २००४ मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर त्यांच्याशी औपचारिक काय अनौपचारिक भेट सुद्धा झालेली नाही. कुठे कार्यक्रमातही तसा संबंध येत नाही. त्यामुळे मनाने अंदाज बांधून ते काहीतरी बोलले असतील. त्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं,” असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.