मुंबई : ‘नीट’च्या झालेल्या गोंधळानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्परीक्षेचा शहरनिहाय निकाल २० जुलै रोजी जाहीर केला. न्यायालयाच्या आदेशानुसार या निकालामध्ये विद्यार्थ्यांची ओळख उघड करण्यात आलेली नाही. निकाल जाहीर झाल्याने आता लवकरच समुपदेशन वेळापत्रक जाहीर होऊन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट यूजी – २०२४’ ही परीक्षा ५ मे २०२४ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.२० दरम्यान ‘एनटीए’द्वारे घेण्यात आली. या परीक्षेला २४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा परदेशातील १४ शहरांसह ५७१ शहरांमधील ४ हजार ७५० केंद्रांवर पार पाडली. त्यानंतर ४ जून २०२४ रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मात्र या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्याने मोठा गोंधळ उडाला. अनेक पालक आणि विद्यार्थ्यांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने १ हजार ५६३ विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेण्याचे आदेश ‘एनटीए’ला दिले होते. त्यानुसार २३ जून २०२४ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५.२० वाजेदरम्यान पुर्नपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ८१३ उमेदवार बसले होते. पुनर्परीक्षेचा निकाल ३० जून २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. मात्र हा निकाल जाहीर करताना उमेदवारांची ओळख उघड करू नये, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १८ जुलै रोजी दिला. त्यानुसार ‘एनटीए’ने २० जुलै रोजी विद्यार्थ्यांची ओळख उघड न करता त्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे शहरनिहाय व केंद्रनिहाय निकाल पुन्हा जाहीर केला.
हेही वाचा – साथरोग नियंत्रणासाठी समस्याग्रस्त भागांत आरोग्य विभागाची विशेष मोहीम!
‘एनटीए’द्वारे निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच समुपदेशनाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. वेळापत्रक आणि श्रेणीनुसार, उमेदवार समुपदेशनात सहभागी होऊन वैद्यकीय, दंत, आयुष आणि नर्सिंग पदवीधर प्रवेश अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील.