स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांकडून करून घ्याव्या लागणाऱ्या काटेकोर आणि कठोर तयारीत महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत किती मागे पडतो आहे हे वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमासाठी यंदा प्रथमच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एन्ट्रन्स कम एलिजिबिलीटी टेस्ट’च्या (नीट) निमित्ताने स्पष्ट झाले आहे. नीटमधील महाराष्ट्राची कामगिरी इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत खराब असून राज्यातून परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ एक तृतीयांश विद्यार्थीच वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. तुलनेत इतर सर्वच राज्यांमध्ये हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. आश्चर्य म्हणजे बिहार-उत्तर प्रदेशनेही महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
यंदा एमबीबीएस व बीडीएस या वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्रीय व राज्याराज्यांतून घेतल्या जाणाऱ्या सर्व प्रवेश परीक्षा रद्द करून ‘नीट’ ही एकच परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून ६,५८,०४० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. परीक्षा देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातले विद्यार्थी सर्वाधिक म्हणजे ९६,५४६ होते. पण, यापैकी केवळ ३३,९६४ म्हणजे सुमारे एक तृतीयांश विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्राखालोखाल बसलेल्या उत्तर प्रदेशातील ७८,२३७ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४४,४६४ विद्यार्थी प्रवेश पात्र ठरले आहेत. हे प्रमाण ५० टक्क्य़ांहूनही अधिक आहे. इतर राज्यांमध्येही हे प्रमाण ५० टक्क्य़ांहून अधिक आहे.
स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जे कठोर प्रशिक्षण द्यावे लागते त्यात आपण कमी पडतो, असे मत डॉ. अरूण बाळ यांनी यासंदर्भात व्यक्त केले. इतर राज्यांमधून या परीक्षांसाठी निवासी वर्ग घेऊन तयारी करवून घेतली जाते. तशी ती आपल्याकडे होत नाही. त्यातून पहिल्यापासूनच नीट परीक्षेसंदर्भात आपल्याकडे गोंधळ होता. विद्यार्थ्यांनी नेमका काय अभ्यास करायचा हे स्पष्ट नसल्याने त्याचा फटका इथल्या विद्यार्थ्यांना बसला आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
सायन्स अकॅडमी आणि एस. पी. क्लासेसचे सुभाष जोशी यांनी याचे खापर पाठय़पुस्तकांवर फोडले. ‘नीटसाठी पहिल्यापासूनच एनसीईआरटीची पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांनी अभ्यासायला हवी होती. त्याऐवजी आपल्या मुलांनी राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकांना महत्त्व दिले.  महाविद्यालयातूनही नीटसाठी स्वतंत्र वर्ग असायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader