मुंबई : मध्य रेल्वेवरील सर्वात मोठय़ा अशा रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असून महाराजांसारख्या पराक्रमी योद्धयाचा पुतळा सँडहर्स्ट रोड येथील बंद कारशेडमध्ये गेल्या तीन वर्षांपासून ठेवण्यात आला आहे. तो उभारण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. हा शिवरायांचा अवमान आहे, अशी टीका करत हा पुतळा सीएसएमटी स्थानकात उभारण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
सीएसएमटी स्थानकाच्या अठरा क्रमांक फलाटाबाहेरील रेल्वेच्या मोकळय़ा परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्याअंतर्गत या परिसरात दहा ते बारा फूट उंच चौथरा आणि त्यावर अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज असा एकूण २० ते २५ फूट उंचीचा पुतळा या परिसरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् अंतर्गत तीन वर्षांपूर्वी फायबरचा पुतळा सँडहस्र्ट रोडमधील वाडीबंदर येथील रेल्वेच्या बंद शेडमध्ये तयार करण्यात आला, मात्र धातूचे काम अंतिम टप्प्यात असतानाच हे काम रेल्वेकडून थांबविण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून शिवरायांचा पुतळा बंद शेडमध्येच आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये ११ ऑगस्टला प्रकाशित झाले. त्यानंतर छत्रपतींचा हा पुतळा सीएसएमटी स्थानकात उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. राहुल शेवाळे यांनीही तीन वर्षांपासून बंदिस्त असलेल्या या पुतळय़ाविषयी कोणताही निर्णय न घेण्यात आल्याने नाराजी व्यक्त करणारे निवेदन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान असल्याची टीका त्यांनी केली आहे.
अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत..
हा पुतळा शिवरायांची आक्रमकता आणि शौर्य दाखवतो. अशा या व्यक्तीपासून प्रत्येक भारतीय व्यक्तीला ऊर्जा मिळते. त्यामुळे अशी प्रतिमा बसविण्यात नेमकी अडचण काय?, असा सवालही खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला आहे. याची माहिती घेण्यासाठी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सीएसएमटी स्थानकात उभारावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ठाकरे गटातील खासदार अरिवद सावंत यांनीही शिवरायांचा पुतळा सीएसएमटीच्या दर्शनी भागात बसविण्याची मागणी केली आहे.