जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकप्रतिनिधींचे उपोषण
मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी धरणे असूनही रस्त्यांच्या विकासासाठी निधी देताना शासनाकडून कायम सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
उपोषण सुरू केले आहे. आमदार दौलत दरोडा, कोकण विभागाचे शिक्षक आमदार रामनाथ मोते, माजी आमदार संजय केळकर यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
शहापूर तालुक्यातील खेडय़ांना जोडणाऱ्या रस्त्यांची अक्षरश: चाळण उडाली आहे.
तालुक्यातील भातसा, तानसा आणि वैतरणा या धरणांमधून मुंबई तसेच उपनगरांना पाणी पुरविले जाते. या पाण्यापोटी मिळणारा कर मुंबई महापालिका सेस रूपाने शासनामार्फत जिल्हा परिषदेस देण्यात येतो. सेसवर शहापूर तालुक्याचा हक्क असताना तो डावलून जिल्हा परिषद इतर तालुक्यांना अधिक निधी देते, असा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे. त्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी लोकप्रतिनिधींनी उपोषण आंदोलन पुकारले आहे.

Story img Loader