वैद्यकशास्त्राला विज्ञानाचा आधार असला तरी अमुक एक उपचार केले की त्याने अचूक परिणाम साधतील, अशी हमी देता येत नाही. मग अशा वेळी उपचार करणाऱ्या डॉक्टरला त्यासाठी जबाबदार धरायचे का अथवा धरता येऊ शकते का, हा मूळ प्रश्न उरतो. सुरुवातीच्या वाक्याचा संदर्भ लक्षात घेतला तर या प्रश्नाचे उत्तर ‘नकारार्थी’ मिळेल. हाच तात्त्विक गुंता एका निकालाद्वारे सोडवीत राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने अपयशी शस्त्रक्रियेला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असा निवाळा दिला.
दिल्ली येथील सतेंदर कुमार हे घरी काही तरी काम करीत असताना त्यांना छोटासा अपघात झाला. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉ. राजू वैश्य यांनी त्यांच्या पायाची तपासणी केली. सतेंदर यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाही, असे डॉक्टरांनी जाहीर केले. डॉ. वैश्य यांनी त्याच दिवशी त्यांच्या पायावर शस्त्रक्रियाही केली. शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पायात सळई (रॉड) बसविण्यात आली. हे सगळे १४ जून २०१२ रोजी घडले. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी सतेंद्रर यांना घरी सोडण्यात आले.
सगळं काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक २३ मे २०१३ रोजी सतेंदर यांना पुन्हा अपघात झाला. या वेळेस त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळीही डॉ. वैश्य यांनीच त्यांच्यावर उपचार केले. सतेंदर यांच्या डाव्या पायालाही फ्रॅक्चर झाले होते. डॉ. वैश्य यांनी त्यांच्या पायावर त्याच दिवशी शस्त्रक्रिया केली. तीन दिवसानंतर सतेंदर यांना घरी पाठविण्यात आले. परंतु डॉ. वैश्य यांनी केलेल्या शस्त्रक्रियेबाबत सतेंदर फारसे समाधानी नव्हते. त्यातच ९ एप्रिल २०१४ रोजी त्यांच्या उजव्या पायावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया केली गेली. या वेळीही शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु, जानेवारी २०१६ पासून त्यांचा डावा पाय दुखू लागला. हे दुखणे एवढे वाढले की त्यांना चालणे कठीण होऊन बसले. त्यामुळे त्यांनी डॉ. वैश्य यांची पुन्हा भेट घेतली आणि पायाच्या दुखण्याचे निदान समजून घेण्याचा प्रयत्न केला. खरे तर सतेंदर हे आधीपासूनच डॉ. वैश्य यांच्या उपचारांविषयी फारसे काही समाधानी नव्हते. त्यामुळेच या वेळेस त्यांनी अन्य वैद्यकीय तज्ज्ञांचाही सल्ला घेतला. त्यात त्यांना डाव्या पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळाला. त्यानंतर ‘साकेत सिटी’ रुग्णालयात सतेंदर यांच्या डाव्या पायावर नव्याने शस्त्रक्रिया करण्यात आली.
एवढा पैसा खर्च करूनही पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागल्याने सतेंदर चांगलेच संतापले होते. त्यामुळे त्यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालय आणि डॉ. वैश्य यांच्याविरोधात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाकडे तक्रार नोंदवली. चुकीच्या पद्धतीने आपल्या पायावर शस्त्रक्रिया केली गेल्याने आपण चार वर्षे काम करू शकलो नाही. उजव्या पायावर शस्त्रक्रिया करताना त्यात सळई बसवण्यात आली होती. पण ती वाकल्याने हे सगळे झाले, असा दावा सतेंदर यांनी तक्रारीत केला. तसेच उपचारांमध्ये केलेला हा वैद्यकीय निष्काळजीपणाच आहे, असा आरोप करीत चुकीच्या शस्त्रक्रियांमुळे झालेले आर्थिक नुकसान, त्यामुळे त्यांना झालेला त्रास याची भरपाई म्हणून दोन कोटी रुपये देण्याची मागणी त्यांनी आयोगाकडे केली.
आयोगाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला. वैद्यकीय निष्काळजीपणा २०१२ मध्ये झाला, तर तक्रार चार वर्षांनी करण्यात आल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर सतेंदर यांना घरी पाठवण्यात आले, त्या वेळी ते योग्य प्रकारे चालू शकत होते, अशी नोंद त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. वैश्य यांनी सतेंदर यांच्या वैद्यकीय फाईलमध्ये नमूद केली होती. त्याची आयोगाने प्रामुख्याने दखल घेत तसे निरीक्षणही निकालात आयोगाने नोंदवले.
प्रत्यारोपण करूनही फ्रॅक्चर एकसंध झाले नाही. परिणामी २०१४ मध्ये सतेंदर यांच्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागली. या शस्त्रक्रियेदरम्यान हाड एकसंध करण्यात आले. ते एकसंध झाल्यावर सतेंदर यांच्या पायात घातलेली सळई काढण्यात आली. त्यामुळे सळई वाकली होती वा शस्त्रक्रिया करताना डॉ. वैश्य यांच्याकडून निष्कळजीपणा झाला हे दाखवणारा कुठलाही पुरावा नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर शस्त्रक्रिया झाली त्या वेळी सतेंदर हे ६६ वर्षांचे होते. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयाचा त्रास होता. शिवाय हाडे एकसंध नसणे यासाठीच तर फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रिया केल्या जातात हे सर्वश्रुत आहे. तसेच हाडे एकसंध नसण्यामागे आरोग्याशी संबंधित व अन्य वैद्यकीय कारणेही आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी न होण्यास वैद्यकीय निष्काळजीपणा कारणीभूत वा जबाबदार आहे हा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.
डॉक्टरची पात्रता आणि त्याने रुग्णाच्या उपचारांसाठी काय पद्धत अवलंबली आहे यावर वैद्यकीय निष्काळजीपणा निश्चित केला जातो. डॉ. वैश्य हे प्रशिक्षित अस्थिरोग शल्यविशारद होते. तसेच त्यांनी सतेंदर यांच्या पायावर शस्त्रक्रिया आणि उपचार करताना प्रमाणित, सर्वमान्य प्रक्रिया व पद्धतीचा अवलंब केला होता, असे राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने ३० नोव्हेंबर २०१६ रोजी याप्रकरणी दिलेल्या आपल्या आदेशात नमूद केले आहे. तसेच हे प्रकरण वैद्यकीय निष्काळजीपणाचे नाही, असा स्पष्ट निर्वाळा देत त्याच आधारे सतेंदर यांची तक्रार फेटाळून लावली.
कुठल्याही ठोस कारणाशिवाय आणि उपचारांचे परिणाम मनाप्रमाणे वा अपेक्षेप्रमाणे मिळाले नाहीत म्हणून डॉक्टरांवर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप लावण्याच्या रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या वृत्तीबाबतही आयोगाने आदेशात तीव्र नाराजी व्यक्त केली.