संघटित गुन्हेगारी टोळीचा कणा पार मोडून काढणाऱ्या मुंबई पोलिसांना रवी पुजारीने आव्हान दिले असले तरी हे आव्हान संपुष्टात आणण्यासाठी त्याच्या ९५ हस्तकांची यादी तयार करून त्यांच्या मागे ससेमिरा लावण्यात आला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या सर्व युनिटना पुजारी टोळीच्या हस्तकांना जेरबंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. खंडणीखोरीत माहीर असलेल्या छोटा राजन, छोटा शकील टोळीने यावर पर्याय म्हणून मोठमोठय़ा तडजोडी तसेच बांधकाम व्यवसायात अप्रत्यक्ष भागीदारीवर भर देऊन खंडणीखोरी सोडून दिली आहे.
खंडणीऐवजी बांधकाम व्यवसायातून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावावर मोठय़ा प्रमाणात पैसा मिळू शकतो, याचा साक्षात्कार सध्या तुरुंगात असलेल्या अरूण गवळीला पहिल्यांदा झाला. त्याने दीड दशकांपूर्वीच भायखळा, सातरस्ता, ना. म. जोशी मार्ग, परळ, लालबाग, शिवडी आदी परिसरातील पुनर्विकास प्रकल्पात सरसकट ‘प्रोटेक्शन मनी’ घेण्याऐवजी थेट प्रकल्पातच भागीदारी घेतली वा काही ठिकाणी सदनिका घेतल्या. त्यापाठोपाठ दाऊद टोळीतील म्होरके दक्षिण मुंबईत बांधकाम व्यवसायात शिरले. पूर्व उपनगरात छोटा राजन टोळीने विशेषत: चेंबूर परिसरातील पुनर्विकास प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात रस घेतला. चेंबूरमधील एकही प्रकल्प छोटा राजनच्या संमतीशिवाय होत नाही. त्यामुळे या टोळ्यांचे खंडणीसाठी दूरध्वनी येणे बंद झाले. गेल्या काही वर्षांत रवी पुजारी वगळता अन्य टोळ्यांकडून खंडणीसाठी दूरध्वनी आलेले नाहीत, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
छोटा शकील टोळीकडून मध्यंतरी वांद्रे येथील भूखंडाबाबत तडजोडीसाठी धमक्या दिल्या गेल्या. अशा तडजोडीतून मोठय़ा प्रमाणात टक्केवारीची मागणी करण्यात आली होती. छोटा राजन टोळीकडूनही अधूनमधून एखाद्या वादग्रस्त मालमत्तेबाबत तडजोडीसाठी दूरध्वनी येत असतो. मात्र तडजोडीसाठी तयार असलेल्या संबंधितांकडून पोलिसांना कळविले जात नाही. अशा तडजोडीतून या गुंड टोळ्यांना रग्गड मलिदा मिळत असतो, अशी माहितीही या अधिकाऱ्याने दिली.
रवी पुजारी टोळीकडून बिल्डरांना खंडणीसाठी दूरध्वनी येत असतो. अगदी कोटी रुपयांची मागणी करता करता मामला काही लाखांवर येऊन ठेपतो आणि काही वेळा बिल्डर धमक्यांविरुद्ध पोलिसांकडे धाव घेतात. यावरूनही पुजारीचे काही हस्तक पकडले गेले आहेत. आताही पुन्हा डोके वर काढलेल्या पुजारीचे आव्हान संपविण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाने सध्या तुरुंगात आणि तुरुंगाबाहेर असलेल्या हस्तकांची यादी तयार करून पोलिसांच्या पथकाचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त सदानंद दाते यांनी सर्व युनिटस्ना याबाबत आदेश दिले आहेत.
“मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा कणा पार मोडून टाकण्यात आला आहे. पुजारी टोळीकडून खंडणीसाठी धमक्या दिल्या जातात. परंतु आता या टोळीचीही नाकेबंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. छोटा राजन, छोटा शकील टोळ्यांकडून खंडणीसाठी धमक्या येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. संघटित गुन्हेगारी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. संबंधितांनी पोलिसांकडे यावे आणि तक्रार द्यावी.”
– राकेश मारिया, पोलीस आयुक्त.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा