कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नालासोपारा भागात घरफोडय़ा करणाऱ्या नेपाळी टोळीतील पाचजणांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १५ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीतील दोन जण सराईत घरफोडी करणारे गुन्हेगार आहेत. या टोळीने घरफोडय़ांची कबुली दिली आहे.
रोशन पदमशाही, रतन शाही, दिनेश कारकी, रामेश्वर कारकी, काबुल सिंग, अशी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून हे पाचजण २० ते ३० वयोगटातील आहेत. यापैकी रोशन आणि रतन हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. गेल्या महिन्यात कल्याण भागात रहाणारे संजय गुप्ता यांच्या घरात चोरी झाली होती. घरातील सिसी टिव्ही कॅमेऱ्यात सोसायटीच्या रखवालदारासह चारजण बंदीस्त झाले होते. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी सुमारे ६० नेपाळींची चौकशी केली होती. त्यामुळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले, असे सहाय्यक आयुक्त बी. व्ही. मोरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.
डोंबिवलीत तरुणाचा खून
डोंबिवली येथील कुंभारखाणपाडा भागातील सर्वोदयनगरमधील मोकळ्या जागेत गौरव कदम (२५) या तरुणाचा मृतदेह सोमवारी विष्णूनगर पोलिसांना आढळून आला असून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.  सर्वोदयनगर भागात एका नवीन गृहसंकुलाचे काम सुरू असून त्या ठिकाणी गौरव काम करीत होता. तसेच त्याच ठिकाणी रहात होता. याच परिसरातील मोकळ्या जागेत सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला. त्याची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. गौरवचा पुर्ववैमनस्यातून खून करण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. 

Story img Loader