दीड वर्षांच्या उपचारानंतर नेपाळी युवक मायदेशी परतला

मायानगरी मुंबईत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या हेतूने सुमारे चार वर्षांपूर्वी तो नेपाळमधून भारतात आला. एकीकडे रात्रशाळेत शिक्षण घेत असताना दिवसा बुटपॉलिश करण्यापासून रुग्णसेवेपर्यंत मिळतील ती कामे करत त्याने दोन वर्षांत तब्बल ६० हजार रुपये साठवले. पण नोव्हेंबर २०१६च्या ‘त्या’ रात्री नोटबंदीची घोषणा झाली आणि काबाडकष्ट करून साठवलेले पैसे केवळ ‘कागज के टुकडे’ बनून गेले. या घटनेचा त्याच्या मनावर इतका प्रचंड आघात झाला की त्याचे मानसिक संतुलनच हरवून बसले..

८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांनी ५०० व एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर देशवासियांनी जे अनुभवले, त्या हालअपेष्टाही कमी वाटाव्यात अशी दारुण कहाणी मोहन (बदललेले नाव) या नेपाळी तरुणाच्या बाबतीत घडली. नेपाळमधील रामेछाप जिल्ह्यतील गोगनपानी येथे राहणाऱ्या मोहनला कुटुंबाचे उदरभरण करण्यासाठी मुंबई खुणावत होती. सिलिगुडी, काकाडविट्टा, कोलकत्ता असा प्रवास करत करत तो मुंबईत आला.

मुंबईत राबणाऱ्या प्रत्येक हाताला काम मिळते, असं म्हणतात. पण मोहनची तशी तयारी असतानाही त्याला कामच मिळत नव्हते. मिळेल त्या ठिकाणी खायचे, झोपायचे असे करत करतच त्याने सुरुवातीला मुंबईत अनेक दिवस ढकलले. एकेदिवशी माटुंगा परिसरात भटकत असताना तेथील डॉन बॉस्को संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी त्याची विचारपूस केली. त्यांनी त्याला वांद्रे येथील सेंडेरोस या रात्रशाळेत प्रवेश मिळवून दिला. इथे रात्री शिक्षण घेता घेता मोहनने दिवसा मिळतील ती कामे करत अर्थाजन सुरू केले. बुट पॉलिश, तेलमालिश, रुग्णसेवा अशी कामे करत त्याने बारावीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. या दोन वर्षांत त्याने स्वत:चा खर्च भागवून साठ हजार रुपयांची रोकड साठवली. कधी तरी घरी जाऊ, तेव्हा हे पैसे घरच्यांना देता येतील, हा त्याचा हेतू होता. मात्र, ८ नोव्हेंबरच्या रात्रीने त्याच्या सर्व स्वप्नांचा चक्काचूर केला.

पंतप्रधानांनी ५०० आणि एक हजाराच्या नोटा बाद झाल्याचे जाहीर केल्यानंतर मोहनच्या पायाखालची वाळूच सरकली. जिथे राहायचा निश्चित ठिकाणा नव्हता, तेथे बँकेत खाते असणार तरी कुठून? नोटा बदलण्यासाठीही बँकेला ओळखपत्राचे पुरावे द्यावे लागत होते. त्यामुळे मोहनने साठवून ठेवलेल्या नोटा केवळ कागदाचे तुकडे बनून गेल्या. या आघाताने मोहन पुरता खचून गेला आणि याच भरात या बाद नोटा लोकलमध्ये प्रवाशांना वाटत असताना पोलिसांनी त्याला पकडले. चौकशीत मोहनचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची रवानगी ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात करण्यात आली. येथे तब्बल एक वर्षभर उपचार घेतल्यानंतर मोहन व्यवस्थित बरा झाला. त्यानंतर गेल्या महिन्यातच मोहन नेपाळला आपल्या मूळगावी रवाना झाला तो मुंबईत न परतण्याचा निर्धार करूनच..

वैद्यकीय समाजसेवक असल्याने मोहन बरा झाल्यानंतर त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने माझे कोणत्याही बॅंकेत खाते नसल्यामुळे आणि मुळातच लोकांची बोलणी खाऊन कष्टाने पैसे कमावले असल्याने मिळालेल्या पैशांचे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे मनावर ताण आल्याचे त्याने सांगितले. पूर्ण बरा झाल्याची खात्री झाल्यानंतरच त्याला त्याच्या घरी पाठविण्यात आले आहे.

      – मारुती डुणगे, समाजसेवक, प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे</strong>

Story img Loader