मुंबई : मध्य रेल्वेवरील पायाभूत कामांची पूर्तता करून, लोकलचा वेग वाढवण्याचे लक्ष्य मध्य रेल्वे प्रशासनाने समोर ठेवले आहे. हार्बर, ट्रान्स हार्बर, कर्जत-खोपोली या दरम्यान रेल्वे रूळांचे सक्षमीकरण आणि इतर कामे पूर्ण करून, लोकलचा वेग वाढवला जाणार आहे. तसेच नेरूळ-खारकोपर दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर सात आसनी शौचालय
सध्या ताशी ८० किमी वेगाने धावणारी लोकल येत्या काळात ताशी १०५ किमी वेगाने धावणार आहेत. मध्य रेल्वेवरील लोकल अवेळी धावणे, वेग मर्यादेमुळे लोकलचा वेग मंदावणे व इतर अनेक कारणांनी लोकलचा कायम खोळंबा होतो. त्यामुळे पायाभूत कामे करून, लोकलचा वेग वाढवण्याची भूमिका मध्य रेल्वे प्रशासनाने समोर ठेवली आहे. यासाठी हार्बर मार्गावरील टिळक नगर ते पनवेल ३३ किमीच्या मार्गावर, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी १८ किमीच्या मार्गावर आणि नेरूळ ते खारकोपर ९ किमीच्या मार्गावर सध्याचा लोकलचा ताशी ८० किमी वेग ताशी १०५ किमीपर्यंत वाढवण्यासाठी कामे सुरू आहेत. कर्जत-खोपोली १५ किमी मार्गावरून ताशी ६० किमी वेगाने धावणाऱ्या लोकलचा वेग ताशी ९० किमी करण्याचे लक्ष्य आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. नवीन वर्षात या चारही ठिकाणांच्या लोकल मार्गाचा वेग वाढणार असून प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल.