सर्वसामान्यांपासून अगदी प्रतिष्ठितांच्या घरात ‘२ मिनिट मॅगी’ने गेल्या २५ वर्षांपासून आपली जागा पक्की केली असताना अचानक त्यात आरोग्याला हानिकारक पदार्थ आढळून आल्याने देशभरात खळबळ माजली. सर्व राज्यांनी मॅगीचे नमुने तपासण्याची कारवाई केली, तर केरळ, दिल्लीने विक्रीवर बंदी आणली. तसेच बिग बाजारनेही मॅगीची विक्री थांबविली. अशा वादात सापडण्याची नेस्ले कंपनाची ही पहिली वेळ नसून या पूर्वीही ती जगभरात अनेक वादांत सापडली आहे. यापैकी तीन प्रकरणे मोठय़ा प्रमाणात गाजली.
नेस्ले कंपनीला १९७० मध्ये लहान मुलांसाठीच्या दुधाचे सूत्र (बेबी-मिल्क फॉम्र्युला) विकसित देशांमध्ये खोटी आश्वासने देऊन विकत असल्याचे प्रकरण चांगलेच भोवले होते. हे दूध मातेच्या दुधापेक्षा किती तरी पटीने सरस असल्याचे जाहिरातींतून रेटून सांगत आफ्रिकेतील विकसनशील देश आणि लॅटिन अमेरिकेमध्ये नेस्ले विकत होती. यावर लंडनच्या एका स्वयंसेवी संस्थेने आक्षेप घेतला होता. यामध्ये विक्री करणाऱ्या मुलींना परिचारिकेच्या वेशात उभे केले जात होते व लोकांना या बेबी-मिल्क फॉम्र्युल्याची पाकिटे मोफत वाटली जात होती.
या प्रकरणी नेस्लेवर सात वर्षे बहिष्कार घातला गेला होता. यावर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेने हस्तक्षेप केल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले होते.
बाटलीबंद पाण्याचे वर्चस्व
यानंतर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायावरील वर्चस्वाने १९९०च्या दशकात यावर आलेल्या एका माहितीपटाने खळबळ माजविली होती. तत्पूर्वीच नेस्लेने पेरियर व सॅन पेल्लेग्रिनो या बाटलीबंद पाणी पुरविणाऱ्या महागडय़ा ब्रॅण्डची खरेदी केली होती. ‘बॉटल लाइफ’ या माहितीपटामध्ये जगभरातील बाटलीबंद पाण्याच्या ७० उद्योगांवर व अमेरिकेतील वेगवेगळ्या संसाधनांवर नेस्लेचे कसे वर्चस्व आहे ते दाखविण्यात आले होते. यावर २००५ मध्ये स्विसच्या विकासक संघटना आणि कृती या संघटनेतर्फे नेस्लेच्या ‘प्युअर लाइफ’च्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले  होते.
चॉकलेट बालमजुरी प्रकरण
नेस्लेच्या चॉकलेट उत्पादनासाठी कोकोच्या बियांचे उत्पादन घेणाऱ्या शेतांमध्ये जवळपास पावणेतीन लाख बालमजूर काम करत असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. हा अहवाल कामगारांसाठी काम करणाऱ्या संघटनेने (एफएलए)ने २०१२ मध्ये उघड केला होता. नेस्लेच्या चौकशीसाठी २०००च्या सुरुवातीपासून मोठय़ा प्रमाणात आंदोलने करण्यात आली होती.
यावर नेस्लेने आपला बचाव करत ही शेते आपल्या मालकीची नसून यामुळे बालहक्कांचे उल्लंघन कंपनीने केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.