मुंबई : शहरातील भटक्या श्वानांच्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या उपक्रमांतर्गत १९९४ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत चार लाखांहून अधिक श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. मुंबईतील ८ ते १० स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महापालिकेने हा उपक्रम राबविला. मात्र २०१४ ते २०२३ या कालावधीत पालिकेला केवळ १ लाख ४८ हजार श्वानांचे निर्बिजीकरण करता आले.

भटक्या श्वानांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केवळ निर्बिजीकरण हाच कायदेशीर मार्ग आहे. अनेक वर्षांपूर्वी श्वान संख्या नियंत्रणासाठी विष टाकणे किंवा अन्य अमानवी पद्धती वापरल्या जात होत्या. चेन्नई आणि जयपूरसारख्या शहरांमध्ये १९९० च्या दशकात ब्लू क्रॉस ऑफ इंडिया आणि हेल्प इन सफरींग या संस्थांनी निर्बिजीकरण आणि लसीकरण कार्यक्रम सुरू केले होते. त्यांनतर देशभरात श्वानांचा निर्बिजीकरण कार्यक्रम सुरू झाला. शहरातील भटके श्वान पूर्वी प्रामुख्याने कचऱ्यातून मिळणाऱ्या अन्नावर अवलंबून होते. मात्र, अलीकडच्या काळात काही नागरिक श्वानांना अन्न देऊ लागले आहेत. रस्त्यावरचा कचरा आणि शिळ्या अन्नातून पोषण मिळत नाही. मात्र, नागरिकांकडून श्वानांना पोषक अन्न दिले जाते. अनेकदा श्वान प्रदेश रक्षणाच्या प्रवृत्तींमुळे आक्रमक होतात. श्वान अनेक वेळा अनोळखी व्यक्तींचा पाठलाग करणे, चावणे किंवा घाबरवणे यासारख्या घटना घडतात. शिवाय, प्रजनन कालावधीत अशा घटनांमध्ये अधिक वाढ होत असल्याने श्वानांचे संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे वेळोवेळी श्वानांचे निर्बिजीकरण केले जाते. महापालिकेने १९९४ ते डिसेंबर २०२३ पर्यंत ४ लाख ३ हजार ३७४ श्वानांचे निर्बिजीकरण केल्याचे पालिकेने प्रकाशित केलेल्या भटक्या श्वानांच्या सर्वेक्षण अहवालातून समोर आले आहे.

महापालिकेने २०१४ ते २०२३ या कालावधीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या साहाय्याने १ लाख ४८ हजार ८४ श्वानांचे निर्बिजीकरण केले. २०१७ मध्ये सर्वाधिक म्हणजेच २४ हजार २९०, तर २०१५ मध्ये सर्वात कमी म्हणजेच ६ हजार ४१४ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. या कालावधीत सरासरी दरवर्षी १४ हजार ८०८ श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. २००८ ते २०१३ या कालावधीत १ लाख २२ हजार १२० श्वानांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्याची वार्षिक सरासरी जवळपास २६ हजार होती. आतापर्यंत २००९ मध्ये सर्वाधिक म्हणजेच ३६ हजार ९९० श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते.