मुंबई : फेब्रुवारी महिना हा एकंदरीतच व्हॅलेंटाईन डे, चॉकलेट डे अशा वेगवेगळ्या प्रेमाच्या संकल्पनांनी भारलेल्या दिवसांचा असतो. त्यामुळे एरव्ही प्रेमपटांमध्येच रमलेल्या बॉलिवूडसाठी हा खास महिना असतो. यंदा मात्र प्रेमीजनांना प्रेपपट पाहण्याऐवजी ‘छावा’ हा ऐतिहासिक चित्रपट किंवा ‘कॅप्टन अमेरिका : ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ हा सुपरहिरोपट पाहून व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार आहे. त्यातल्या त्यात ‘सनम तेरी कसम’ हा २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला प्रेमपट पुन्हा व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित होणार असल्याने त्याचाच काय तो आधार प्रेमीजनांना मिळू शकतो.
हिंदी चित्रपटसृष्टीतील आजही आघाडीचे कलाकार म्हणून गणल्या जाणाऱ्या शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान यांच्या कारकिर्दीमधील चित्रपटांवर नजर टाकली तर त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये प्रेमपटांची संख्या अधिक आहे. ‘कयामत से कयामत तक’, ‘मैने प्यार किया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हे या तिघांचे सर्वाधिक यशस्वी ठरलेले प्रेमपट. एकेकाळी फेब्रुवारी महिन्यात खासकरून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मुद्दाम प्रेमपट प्रदर्शित केले जात असत. आता मात्र एकूणातच प्रेमपटांची संख्या कमी झाली आहे, त्यांची जागा ॲक्शनपट, चरित्रपट, ऐतिहासिकपटांनी मोठ्या प्रमाणावर घेतली आहे.
चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते एखादा चित्रपट सुपरहिट ठरला किंवा त्याने ५०० कोटींहून अधिक कमाई केली की त्यापुढचे चित्रपट हे साधारणपणे त्याच धर्तीवरचे असतात. गेल्यावर्षी विनोदी भयपट मोठ्या संख्येने प्रदर्शित झाले आणि त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘स्त्री २’ आणि ‘मुंज्या’ या दोन भयपटांचा समावेश होता. याशिवाय, अजय देवगण आणि आर. माधवनची मुख्य भूमिका असलेल्या ‘शैतान’लाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा विनोदी भयपट आणि त्याबरोबरीने सिक्वेलपट बनवण्याकडे बॉलिवूडचा अधिक कल असल्याचे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
प्रेमपटांची निर्मिती आणि लोकप्रियता कमी झाली आहे हे मात्र चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ नाकारतात. यंदा फेब्रुवारी महिन्याची सुरूवातच ‘लवयापा’ या चित्रपटाने झाली होती. आमिर खानचा मुलगा जुनैद खान आणि जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘लवयापा’ हा चित्रपट आजच्या डिजिटल युगातील तरुण पिढीच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा होता. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर कोणताही नवा प्रेमपट प्रदर्शित झाला नसला तरी या वर्षभरात निश्चितच नवीन प्रेमपट पाहायला मिळतील, असे चित्रपट व्यावसायिकांचे म्हणणे आहे. नुकतेच दिग्दर्शक रोहित शेट्टी यानेही ‘सिम्बा’ या चित्रपटात लोकप्रिय ठरलेली जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री सारा अली खान यांना घेऊन नवीन प्रेमपट करणार असल्याची घोषणा केली आहे. नवे प्रेमपट प्रदर्शित होत नाहीत, तोवर २०१६ साली प्रदर्शित झालेल्या अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन यांच्या ‘सनम तेरी कसम’ या पुन:प्रदर्शित प्रेमपट पाहात प्रेमीजनांना यंदाचा व्हॅलेंटाईन डे साजरा करावा लागणार आहे.