मुंबई : कारागृहामध्ये जन्माला आलेल्या बालकांच्या जन्म दाखल्यावर कारागृहाचे नाव लिहिल्यामुळे त्यांना आयुष्यभर बदनामीला सामोरे जावे लागत आहे. या बदनामीपासून या बालकांना आता मुक्ती मिळणार आहे. राज्यातील कारागृहामध्ये जन्माला आलेल्या मुलांच्या जन्म दाखल्यावर आता जन्मस्थान म्हणून कारागृहाऐवजी संबंधित शहर किंवा गावाच्या नावाची नोंद करण्यात येणार आहे. या नव्याने जारी करण्यात आलेल्या आदेशाचे राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांनी काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा <<< सिद्धार्थनगरमधील सदनिकांच्या हस्तांतरण-नियमितीकरणासाठी विशेष मोहीम
एखाद्या गुन्ह्यात महिला आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्यांची रवानगी कारागृहामध्ये केली जाते. यापैकी गर्भवती असलेल्या महिला कारागृहातच मुलाला जन्म देतात. त्यामुळे अशा मुलांच्या जन्म दाखल्यावर जन्मस्थानाच्या जागी ‘कारागृह’ अशी नोंद होते. भविष्यातही ती कायम राहते. यामुळे कोणताही दोष नसताना या मुलांच्या माथी ‘कारागृहा’चा शिक्का बसतो. त्यामुळेच कारागृहात जन्मलेल्या मुलांच्या जन्म दाखल्यावर ‘कारागृह’ अशी नोंद न करता ते कारागृह असलेल्या ठिकाणाची म्हणजे शहर किंवा गावाच्या नावाची नोंद करावी, असे आदेश जारी करण्यात आले आहेत. यापूर्वी जन्म दाखल्यावर कारागृहाचा उल्लेख असल्यामुळे अनेक मुलांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्यात अडचणी निर्माण होतात. म्हणून आता या मुलांच्या जन्म दाखल्यावर गावाची वा शहराच्या नावाची नोंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याबाबतचे आदेश सर्व कारागृहांना देण्यात आले आहेत.
हेही वाचा <<< पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरण : संजय राऊत यांच्याविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र
राज्यात १३ खुल्या कारागृहांसह मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांत मध्यवर्ती कारागृहे आणि प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा कारागृह अशी लहान-मोठी तब्बल ६० कारागृहे आहेत. या सर्व कारागृहांची एकूण क्षमता २४ हजार ७२२ कैद्यांना ठेवण्याची आहे. परंतु सध्यस्थितीत या कारागृहांमध्ये सुमारे ४३ हजारहून अधिक कैदी बंदिस्त आहेत. यात न्याय बंदींसह शिक्षा झालेल्या कैद्यांचा समावेश आहे. मुंबईतील भायखळा कारागृहासह येरवडा आणि अकोला येथे महिलांसाठी खुली कारागृहे आहेत.