मुंबई : मालाड पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मालाड पी-उत्तर विभागात येत्या काळात विविध ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी तब्बल १९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मालाड पश्चिम येथे लोकसंख्या जास्त आणि अरुंद रस्ते यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी असते. या भागात उड्डाणपूल नसल्यामुळे वाहने जागच्याजागी खोळंबलेली असतात. यावर पर्याय म्हणून मुंबई महापालिकेने काही भागात उड्डाणपूल उभारून वाहतूक कोंडी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालाड पश्चिम येथील रामचंद्र नाला जोडणारा पूल उभारण्यात येणार आहे. एमडीपी रोडपासून ते रायन इंटरनॅशनल स्कूल, मालाड मार्वे रोडपर्यंत या पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच मालाड पश्चिम येथील लगून रोडपासून इन्फिनिटी मॉलपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यावर सकाळ-सायंकाळी होणारी वाहतूक कोंडी दूर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – अनुज थापनच्या कोठडी मृत्यूच्या चौकशी अहवालासाठी न्यायदंडाधिकाऱ्यांवर दबाव टाकणार नाही, उच्च न्यायालयाने कुटुंबीयांना बजावले

या दोन्ही पूलांसाठी पालिकेने आचारसंहितेच्या आधी निविदा प्रक्रिया राबवली असून १३ नोव्हेंबरपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात पुलाच्या कामाला डिसेंबर २०२४ पासून सुरुवात होणार आहे. या पुलांसाठी १९२ कोटी ९७ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. एका आर्थिक वर्षात हा खर्च करणे शक्य नसल्यामुळे २०२५-२६ व २०२६-२७ या आर्थिक वर्षात या पुलासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. हे दोन्ही पूल ४२ महिन्यांत उभारण्यात येणार असून सुरुवातीचे ६ महिने या पुलांच्या बांधकामाच्या पूर्वतयारीसाठी कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. पालिकेने हाती घेतलेली पुलांची कामे रखडत असल्यामुळे उर्वरित ३६ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे.

हेही वाचा – सप्टेंबर ठरला सर्वात उष्ण महिना जाणून घ्या, भारतासह जगभरात किती तापमान होते

नोंदणीसाठी कंत्राटदाराला तीन महिन्यांची मुदत

मालाड येथील पुलाचे काम मिळविण्यासाठी इच्छुक कंत्राटदार मुंबई महापालिकेत नोंदणीकृत नसेल, तर कंत्राट मिळाल्यापासून तीन माहिन्यांत त्याला नोंदणीकरिता अर्ज करावा लागणार आहे, अन्यथा त्या कंत्राटदाराची इसारा रक्कम जप्त करण्यात येईल. ज्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात आलेले नाही. तसेच त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही, असाच कंत्राटदार या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतो, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.