मुंबई : कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. हे १६५ खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली असून तीन वर्षांत रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी २१३ कोटी रुपये खर्च येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परळ आणि खारघर येथील टाटा रुग्णालयात देशातून मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात. मुंबई महानगरपालिकेने नायर रुग्णालयात कर्करोगावरील उपचार सुरू केले आहेत. परंतु वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही व्यवस्था फारच अपुरी ठरत आहे. कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वांद्रे येथील भाभा रुग्णालयाच्या जवळील आर. के. पेटकर मार्गावर मुंबई महानगरपालिकेसाठी आरक्षित असलेल्या २ हजार ५२५ वर्ग मीटर भूखंडावर स्वतंत्र कर्करोग रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी घेतला होता. पालिकेच्या वास्तुविशारदांनी रुग्णालय उभारण्यासंदर्भातील आराखडा तयार केल्यानंतर बांधकामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत कंत्राटदार निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा : घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटना : २२ व्यवहारांबाबत तपासणी सुरू

रुग्णालय असे…

कर्करोग रुग्णालयाची इमारत ही दोन तळघरांसह १० मजली असेल. जवळपास १३ हजार वर्ग मीटर इतके बांधकाम करण्यात येणार आहे. इमारतीच्या एक ते आठ मजल्यांवर कर्करोगासंदर्भातील उपचारांच्या सुविधा असतील. तसेच नवव्या आणि दहाव्या मजल्यावर अधिकारी, कर्मचारी आणि डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था असेल.

हेही वाचा : मुंबई: आरपीएफच्या उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक

सुविधा काय?

रुग्णालयामध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपी, अतिदक्षता विभाग, अद्यायावत कर्करोग उपचार सुविधा असणार आहेत. यामध्ये रेडियोथेरेपीसाठी दोन स्वतंत्र कक्ष, १२ बाह्यरुग्ण कक्ष, विविध प्रकारच्या पाच प्रयोगशाळा, मॅमोग्राफी आणि पीईटी-सीटी युनिट्स, सभागृह, रक्तपेढी, विलगीकरण कक्ष, रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New cancer hospital in mumbai within 3 years 213 crores expected cost with 165 bed capacity mumbai print news css
Show comments