हवालदार, शिपायांच्या टोपीत बदल; दक्षिण मुंबईत प्रयोग सुरू
शस्त्रांपासून तपासांच्या साधनांपर्यंत ‘स्मार्ट’ झालेल्या मुंबई पोलीस दलातील हवालदार, शिपाई या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या टोपीत आता बदल होणार आहे. डोक्यावर व्यवस्थित न बसणारी, आरोपीच्या मागे धावताना कधीही खाली पडणारी टोपी बदलावी, यासाठी शिपाईवर्गाकडून आलेल्या तक्रारींची दखल पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. त्यानुसार, शिपायांच्या डोक्यावर दिसणारी होडीच्या आकाराची टोपी जाऊन आकर्षक निळय़ा रंगाची ‘कॅप’ दिसू लागली आहे. दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर हा बदल सुरू करण्यात आला असून, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून ही टोपी अन्य ठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही पुरवण्यात येईल.
शिपाई असो की पोलीस निरीक्षक पोलिसांचा गणवेश सारखाच. पण जेव्हा डोक्यावर टोपी येते तेव्हा अधिकारी आणि शिपाई यांच्यातला फरक स्पष्ट जाणवतो. पोलीस दलाचा कणा असलेल्या पोलीस नाईक, शिपाई, हवालदार या अंमलदारांच्या डोक्यावरल्या जुन्या टोपीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बऱ्याच तक्रारी आल्या होत्या. अनेकांच्या डोक्यावर त्या नीट बसत नाहीत. धावपळीत, आरोपीचा पाठलाग करताना किंवा हातघाईच्या प्रसंगात त्या डोक्यावरून सरकतात, खाली पडतात. या तक्रारींची दखल पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी घेतली. टोपी घातल्यावर रुबाब कायम रहावा, योग्यपणे वापर व्हावा हे डोळ्यांसमोर ठेवून नव्या ढंगाच्या टोप्यांचा प्रयोग सुरू करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी खेळाडू वापरतात तशा टोपी दक्षिण मुंबईतल्या विशेषत: मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील काही अंमलदारांना देण्यात आल्या. गर्द निळा (नेव्ही ब्ल्यू) रंग, पिवळ्या रंगाची पट्टी, दर्शनी भागावर मुंबई पोलीस दलाचे बोधचिन्ह, दोन्ही बाजूला मुंबई पोलीस असा ठसा अशा रूपातली नवी टोपी घातलेले अंमलदार शुक्रवारी विधिमंडळ, मरिन ड्राइव्ह परिसरात आढळले.
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार टोपी हा पोलीस गणवेशाचा भाग असला तरी त्यातील बदल विभाग प्रमुख म्हणजेच पोलीस आयुक्त सुचवू शकतात. अनेक वष्रे पोलीस अंमलदारांनी जुनी टोपी वापरली. मात्र ती डोक्यात नीट बसत नाही, सारखी खाली पडते, अशा तक्रारी अंमलदारांकडून वरिष्ठांना मिळत होत्या. त्यामुळे नव्या टोपीबाबत प्रयोग सुरू करण्यात आला.
शिपायांच्या टोपीत लगेच बदल केला जाणार नाही किंवा याबाबत घाईघाईत निर्णयही घेतला जाणार नाही. याबाबत सध्या प्रयोग सुरू आहेत. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर योग्य प्रक्रिया पूर्ण करून बदल केले जातील.
– दत्ता पडसलगीकर, पोलीस आयुक्त, मुंबई