मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील समीकरणे पूर्णत: बदलून टाकणाऱ्या ‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ या दोन मनोरंजन समूहांचे विलीनीकरण गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पूर्ण झाले. मात्र या दोन्ही समूहांची एकत्रित मनोरंजन वा ओटीटी वाहिनी सुरू करण्यात आली नव्हती. अखेर व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर ‘जिओहॉटस्टार’ ही नवी ओटीटी वाहिनी ग्राहकांच्या सेवेत शुक्रवारी दाखल होत आहे.

‘वायकॉम १८’ आणि ‘स्टार इंडिया’ यांच्या विलीनीकरणानंतर ‘जिओस्टार’ या नावाने दोन्ही समूह एकत्र आले होते. या नावाने संकेतस्थळही सुरू करण्यात आले. मात्र एकत्रित नव्या वाहिनीची घोषणा करण्यात आली नव्हती. आता ‘जिओस्टार’ या नव्या कंपनीअंतर्गत जिओ सिनेमा आणि डिस्ने हॉटस्टार या दोन ओटीटी वाहिन्यांना एकत्र आणणाऱ्या ‘जिओहॉटस्टार’ या नव्या वाहिनीची सुरूवात शुक्रवारी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर होत आहे. ‘जिओहॉटस्टार’ या वाहिनीवर १९ पेक्षा अधिक भाषांमधील वैविध्यपूर्ण आशय प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे.

यात चित्रपट, वेबमालिका यांच्यासह लाईव्ह खेळांचे सामने आणि क्रीडाविषयक आशयही प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. ‘जिओहॉटस्टार’वरचा आशय सध्या प्रेक्षकांना कोणतेही शुल्क न भरता पाहता येणार आहे.

मात्र कोणताही आशय जाहिराती वा अन्य अडथळ्यांशिवाय पाहायचा असेल तर ते सशुल्क १४९ रुपयांपासून सुरू होणाऱ्या सबस्क्रिप्शन प्लॅनमधून उपलब्ध होईल. शिवाय जिओ सिनेमा आणि डिस्ने हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शन असलेल्या प्रेक्षकांना त्याच शुल्कात ‘जिओहॉटस्टार’वरचा सगळा आशय पाहता येणार आहे.

‘मनोरंजन विशिष्ट वर्गापुरते मर्यादित न राहता समस्त भारतीय प्रेक्षकांना बहुभाषिक आशय पोहोचवणे हा दृष्टिकोन ‘जिओहॉटस्टार’च्या मागे आहे. १९ पेक्षा अधिक भाषांमधील आशय आम्ही या वाहिनीवर उपलब्ध करून दिला आहे’ असे जिओस्टारच्या डिजिटल विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण मणी यांनी सांगितले. तर ‘जिओहॉटस्टार’ ही वाहिनी डिजिटल मनोरंजन विश्वात नवे मापदंड निर्माण करेल, असा विश्वास जिओस्टारच्या मनोरंजन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केविन वाझ यांनी व्यक्त केला. ‘जिओहॉटस्टार’वर डिस्ने, एनबीसी युनिव्हर्सल, वॉर्नर ब्रदर्स, डिस्कव्हरी एचबीओ, पॅरामाऊंट अशा नामांकित हॉलीवूड कंपन्यांचा आशयही उपलब्ध होणार आहे.

Story img Loader