ठाणे महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी निवासस्थानात नियम धाब्यावर बसवून बांधकामे केल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच निविदा न काढताच ही बांधकामे केल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. मात्र, महापालिका प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले असून कोणतेही नियमबाह्य़ काम केलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोलशेत येथील सर्व्हे नं. १४६ भूखंड वन खात्याच्या खासगी वनेअंतर्गत येतो. याच भूखंडावर ठाणे महापालिका आयुक्तांचे हेरिटेज निवासस्थान आहे. हा भूखंड १९८४मध्ये महापालिकेने विकत घेतला असून त्या जागेवर आयुक्त राजीव येण्यापूर्वी असलेल्या बांधकामाची नोंद महापालिकेच्या शहरविकास विभागाकडे उपलब्ध नसल्याचा दावा सरनाईकांनी केला. आयुक्त राजीव यांनी अंतर्गत
बदलांसाठी निविदा न काढताच लाखो रुपयांची कामे करून घेतली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
यापूर्वीच्या आयुक्तांच्या काळात निवासस्थानासमोरील पोर्चचा उपयोग खासगी वाहने व अभ्यागतांची वाहने ठेवण्यासाठी होत होता. मात्र, राजीव यांनी सुमारे तीन हजार चौरस फुटांचा उघडा पोर्च कार्यालयीन कामकाजाकरिता तसेच अभ्यागतांसाठी नव्याने बांधला.
महापालिका हद्दीत कुठल्याही प्रकारे अनधिकृत बांधकाम करणे किंवा मंजूर नकाशाव्यतिरिक्त वाढीव बांधकाम करणे, हा कायद्याने गुन्हा असल्याने या प्रकरणातील संबंधितांवर करवाई करून त्याचा अहवाल देण्याची मागणी शहर विकास विभागाकडे केल्याचे सरनाईकांनी सांगितले.
दरम्यान, महापालिका आयुक्तांचे निवासस्थान खासगी वने आरक्षण भूखंडावर असून  वन कायदा अस्तित्वात आल्यानंतर वाढीव बांधकाम करण्यात आलेले नाही, तसेच शासनाच्या अध्यादेशानुसारच निवासस्थानामध्ये कामे करण्यात आली असल्याचे महापालिकाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.